दिनांक ५ मे २०२६, श्रीगोंदा/पुणे:
मोबाईलवर चॅटिंग करण्यावरून विचारणा केल्याच्या कारणावरून, श्रीगोंदा येथील रहिवासी असलेल्या विजय कारंडे याने आपल्या पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यावेळी आईला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पोटच्या मुलालाही आरोपीने क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण केली.

विजय कारंडे हे एका कॅबिनेट मंत्र्यांचे खासगी स्वीय सहाय्यक (PA) आणि ओएसडी (OSD) म्हणून कार्यरत आहेत. ही घटना ३० एप्रिल रोजी पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथील कारंडे यांच्या निवासस्थानी घडली.

विजय कारंडे मोबाईलवर कोणाशी तरी चॅटिंग करत असताना त्यांच्या पत्नीने सहज विचारणा केली. याचा राग अनावर झाल्याने कारंडे यांनी पत्नीला अश्लील शिवीगाळ करत तिचा गळा आवळला. यावेळी लहान मुलगा मदतीला धावला असता, कारंडे यांनी त्यालाही क्रिकेटच्या बॅटने गंभीर जखमी केले.
घटनेनंतर जखमी पत्नीने सुरुवातीला अहिल्यानगर येथे धाव घेऊन तक्रार दिली होती. मात्र, घटना पुण्यात घडल्याने हा गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

सध्या पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात विजय कारंडे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. मंत्र्यांच्या निकटवर्तीय असलेल्या श्रीगोंद्याच्या या व्यक्तीने केलेल्या कृत्यामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
स्रोत:(ऑनलाइन वृत्त)















Leave a Reply