दिनांक ४ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते बाप्पू माने यांना जीवे ठार मारण्याचा कट रचला जात असल्याची गंभीर माहिती उघड झाली आहे. मानेंच्या विश्वासू मित्रांकडून आणि खबऱ्यांकडून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत बाप्पू माने यांनी माध्यमांना माहिती देत आपला जीविताचा धोका उघड केला आहे.

“माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याची गोपनीय माहिती मला मिळाली आहे. या संदर्भात श्रीगोंदा पोलीस प्रशासनासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे,” असे माने यांनी स्पष्ट केले.

राजकीय वैमनस्यातून षडयंत्र:
बाप्पू माने यांच्याविरोधात तालुक्यातील काही राजकीय नेत्यांकडून द्वेष वाढल्याचे समोर येत आहे. “मी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडत नाही. नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या गैरकृत्यांना विरोध करत असल्यामुळे माझ्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. एका बड्या राजकीय नेत्याने माझ्या विरोधकांना ‘मारहाण करताना थेट ठार करा’ असे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे,” असे माने यांनी सांगितले.

जमिनीच्या व्यवहारांमध्ये परस्पर खरेदी-विक्रीच्या प्रकरणांवर बाप्पू माने वारंवार वरिष्ठ प्रशासनाला (कलेक्टर, मुख्याधिकारी) माहिती अधिकारातून अर्ज करून माहिती मागवतात. यामुळे अनेक राजकीय नेत्यांमध्ये माने यांच्याविरोधात रोष निर्माण झाला आहे.

“मी लवकरच कायदेशीर मार्गाने या षडयंत्राचा पर्दाफाश करणार आहे. स्थानिक प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेऊन मला संरक्षण द्यावे,” अशी मागणी माने यांनी केली आहे.
स्रोत:(अधीकृत माहिती नुसार)
