हंगेवाडीत सार्वजनिक रस्त्यावर वाद: महिलांना शिवीगाळ, धमकी व धक्काबुक्की प्रकरणी ॲट्रॉसिटी नुसार फिर्याद दाखल..

दिनांक ११ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:

हंगेवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे सार्वजनिक रस्त्याच्या वापराबाबत वाद निर्माण होऊन महिलांना शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणी वंदना अशोक सोनवणे (वय 60, रा. हंगेवाडी) यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी वंदना सोनवणे या त्यांच्या सुन पुजा, जाव सुमन सोनवणे, मुलगी सुरेखा रमेश डोईफोडे आणि चुलत सुन रेश्मा भाऊसाहेब सोनवणे यांच्यासोबत शिवारातील शेतात कांदे खुरपण्यासाठी गेल्या होत्या. काम आटोपून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतत असताना त्यांना शिवरस्त्याजवळ कैलास गंगाधर रायकर, तुकाराम रामभाऊ रायकर, नवनाथ नामदेव रायकर आणि विठ्ठल सखाराम रायकर हे जेसीबीने रस्ता उकरताना दिसले.

वंदना सोनवणे यांनी रस्ता उकरण्याचे कारण विचारताच संबंधित व्यक्तींनी त्यांच्यावर संताप व्यक्त करत घाणघाण शिवीगाळ केली. यावेळी त्यांची मुलगी सुरेखा डोईफोडे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता कैलास रायकर यांनी तिला धक्काबुक्की केली. त्यावेळी कैलास रायकर यांच्या हातात कोयता होता. त्यांनी महिलांना परत या रस्त्याने गेल्यास कोयत्याने तोडून जीवे मारण्याची धमकी दिली.

घटनेनंतर वंदना सोनवणे यांनी बेलवंडी पोलीस ठाणे गाठून कैलास रायकर, तुकाराम रायकर, नवनाथ रायकर आणि विठ्ठल रायकर यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधितांवर शिवीगाळ, धक्काबुक्की आणि जीवे मारण्याच्या धमकीचे गंभीर आरोप दाखल केले आहेत.

बेलवंडी पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून घटनास्थळी पंचनामा केला आहे. गावात यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी सार्वजनिक रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading