श्रीगोंदा | २० जुलै २०२६:
शहराच्या मध्यवर्ती भागात अनं दाट लोकवस्तीत नियमांची पायमल्ली करून थाटलेली एक भेळ कंपनी सध्या स्थानिक रहिवाशांसाठी जिवंत नरक बनली आहे. श्रीगोंदा नगरपालिकेच्या संशयास्पद आणि भ्रष्ट धोरणांमुळे हा ‘उद्योग’ की ‘आपत्ती’ असा प्रश्न आता जनसामान्यांना पडला आहे. तसेच या कंपनीचे संपूर्ण कामकाज नियमांना धाब्यावर बसवून चालवले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एवढ्या मोठ्या क्षमतेने उत्पादन करणारी ही कंपनी पक्क्या बांधकामाऐवजी एका साध्या पत्र्याच्या शेडमध्ये थाटली आहे. विशेष म्हणजे, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असूनही या कंपनीकडे ग्राहकांसाठी किंवा कामगारांच्या वाहनांसाठी कोणतीही पार्किंग सुविधा उपलब्ध नाही.

रहिवासी भागात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक हालचाली होत असतानाही नगरपालिकेने या उद्योगाला कशाच्या आधारे परवानगी दिली? यात काही आर्थिक गैरव्यवहार किंवा लाचखोरी झाली आहे का? याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचा सुर आता व्यक्त होत आहे.
या कंपनीमध्ये भेळ तयार करण्यासाठी डिझेल भट्टीचा वापर केला जात असल्याचे अधिकृत समजले आहे. यासाठी वारंवार स्वतंत्र डिझेल टँकर भरवस्तीत येत असल्याने धोक्याची पातळी वाढली आहे. निवासी क्षेत्रात ज्वलनशील पदार्थांचा अशा प्रकारे वापर करणे अत्यंत असुरक्षित असून, यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकवस्तीत चालणाऱ्या या अनधिकृत कारभारामुळे एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोणाला धरायचे?
याला परवानगी देणारे नगरपालिका प्रशासन जबाबदार असेल, की नियमांचे उल्लंघन करणारा व्यावसायिक? की परिस्थितीशी जुळवून घेणारे आसपासचे रहिवासी? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यापूर्वीच प्रशासनाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा, एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन खडबडून जागे होणार का, असा प्रश्न श्रीगोंदेकरांना पडला आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
