दिनांक २० जुलै २०२६, श्रीगोंदा | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी, युवक आणि शिक्षण वाचवा आंदोलनाला श्रीगोंदा तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. नीटसह विविध राष्ट्रीय शैक्षणिक परीक्षांमधील कथित पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ श्रीगोंदा येथे तहसीलदार मा. डोंगरे यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी म्हटले की, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे कष्ट, स्वप्ने आणि भविष्य धोक्यात आले आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
याचबरोबर, शैक्षणिक सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्याशी पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न हा लोकशाही मूल्यांवर आघात असून, संघर्ष करणाऱ्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला श्रीगोंदा तालुक्यातून संपूर्ण पाठिंबा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी संघर्ष क्रांतीचे सर्वेसर्वा मा. प्रशांत दरेकर, भाऊसाहेब नेटके, सुनील भोस, प्रमोद म्हस्के, अशोक नवले, स्वप्निल लाटे, गंगाराम दरेकर, सुयोग गोसावी, सुनिल दरेकर, पृथ्वीराज भोस, शशिकांत पवार तसेच तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत: (प्रसिद्धी पत्र )
