दलित युवकाच्या हत्येचा दलित महासंघाच्या वतीने निषेध, आरोपींना फाशी देण्याची मागणी.

दिनांक १७ जून,अहमदनगर:

पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर येथील दलित समाजाच्या युवकाची झालेल्या हत्येचा दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदविण्यात आला. तर या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे, ज्येष्ठ नेते नामदेवराव चांदणे, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, राहुल गायकवाड, विकास भाकरे, माँटी भाकरे, सागर वैराळ, रोहित दिवे, दीपक बिडवे, केतन पाटोळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

पुरोगामी महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाही. विज्ञानवादी युगात देखील जातीयवादी प्रवृत्ती कडून गोरगरीब दलितांवर अमानुष अत्याचार होत आहेत. अशा घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पिंपरी चिंचवड येथील पिंपळे सौदागर गावातील दलित समाजातील युवक विराज जगताप त्यांच्या गावातील सवर्ण मुलीवर प्रेम करतो.म्हणून, तो दलित समाजाचा असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी विराजची निर्घुण हत्या केली. तो कुटुंबातील एकुलता एक कमवता मुलगा होता. त्याच्या हत्येने त्यांच्या घरातील मोठा आधार निघून गेला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून, हत्या करणार्‍या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मयत युवकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घ्यावे, अत्याचारग्रस्त कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील दलित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस कठोर शिक्षा करुन, पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading