बलुत.
सकाळी माझ्याच वयाची आम्ही मुलं झोपेतून उठलो , म्हणजे रात्री कोणतं स्वप्न पडलं हे विचारलं जायचं . स्वप्नात आग आली म्हणजे अमूक आकडा, पाणी आलं तर फलाणा आकडा , हा संवाद चालायचा . ‘ चिना बेटिंग ‘ हा खेळ खेळायला तर एक आणाही पुरे . या खेळात घरातील सर्व वडीलधारी स्त्री – पुरुष मंडळी हौसेनं भाग घेत . फुटपाथला पडलेल्या , अंगावर खंडीभर मळ असलेल्या वेड्यालाही ह्या सट्ट्याच्या खेळात भाव यायचा . त्यानं काहीही खुणा केल्या , तरी त्यांवरून अर्थ काढला जायचा . त्यातून एखाद्याचं नशीब फळफळलं तर वेड्यालाही योगी पुरुषाचा भाव येई . क्लबला जोडूनच घोड्याच्या नालाच्या आकाराची एक कौलारू चाळ होती . तीत आम्ही राहत असू . आमच्या खोलीशेजारीच आजीच्या थोरल्या बहिणीची चार कर्तबगार मुलं राहत होती . माझ्या सख्ख्या चुलत्याचं नाव जबा , तर मावस चुलत्यांची नावं रभा , नबा , शिवा आणि कबा अशी होती . त्यांत कुणाला मी तात्या म्हणत असे , तर कुणाला बाबा . ह्यांपैकी कुणी हातगाडी ओढी , तर कुणी हमाली करी . सुरुवातीला वडीलच गोदीत होते . त्यांनी नंतर एकेकाला चिकटवून घेतलं .
आजी भायखळ्याजवळच असलेल्या कुत्र्यांच्या दवाखान्यात कामाला होती . ओळखीच्या साहेबांनी तिच्यावर मेहेरबानी केली होती . साहेब लोकांची कुत्री तिथं औषधोपचाराकरिता येत . कुत्र्यांना दूध पाज , त्यांची विष्ठा काढ . त्यांना साबणानं आंघोळ घाल- ही तिची कामं . आजीबरोबर मीही केव्हा केव्हा दवाखान्यात जायचो . नुकतीच जन्माला आलेली कुत्र्याची पिल्लं मला खूपच आवडायची . सारखं बघत राहावंसं वाटायचं . चिनी मातीच्या पसरट भांड्यात दूध पितानाचा त्यांचा मचमच आवाज ऐकून गंमत वाटायची . त्यांना कुरवाळण्याचा मोह व्हायचा . पण साहेब काय म्हणेल , ह्या भीतीनं त्यांना हात लावण्याचं धाडस होत नसे . आपला कोट कावाखान्यात आमचं नातेवाइकांचं तसं छोटं बेटच होतं . वारा – वावधानात माणूस आवळून घेतो म्हणतात . तसे हे नातेवाईक एकमेकांच्या आसऱ्यानं तिथं राहात होते . त्यांच्यातील प्रेम आणि द्वेष तसेच पराकोटीचे . भांडणातून वाटायचं , की ही माणसं उद्या एकमेकांची तोंडं पाहणार नाहीत ; एवढ्या मोठ्या महानगरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली जातील ; पण वास्तवात तसं होत नव्हतं . शेंगांचा वेल उपटल्यानंतर साऱ्या शेंगा वेलाबरोबर याव्यात , तशी यांची अवस्था होती . ही माणसं प्रथम इथं राहावयास आली , तेव्हा समोरची टोलेजंग इमारत रिकामीच होती . पण दादरानं चढाय – उतरायचा त्रास नको , म्हणून त्यांनी ही तळाचीच कौलारू चाळ पसंत केली . ही बहुधा कधीकाळी घोड्यांची पागा असावी . त्यांच्या अज्ञानानं आजही हसू येतं . अर्थात तेवढंच काही कारण नसावं . त्यांचा व्यवसाय म्हणजे साऱ्या मुंबईचा केरकचरा गोळा करून आणायचा . तेव्हा हा धंदा करणाऱ्याला समोरच्या इमारतीच्या फ्लॅटमध्ये कोण राहू देणार ? पण त्यामुळे कोणत्या नरकात त्यांनी दिवस काढले !
पुढे माझ्याही आयुष्याची किती उमेदीची वर्षे ह्या खाचरात गेली ? पावसाळ्यात जवळ जवळ सर्वांच्याच खोल्या गळत . रात्रभर डबडी , भगोली – घमेली ठायी ठायी ठेवली जायची . ह्या जलतरंगाच्या आवाजात कधी झोप लागायची , ते कळायचंही नाही . आजुबाजूच्या घरांमध्ये सुरुवातीला मीच एकटा लहान . खूपच कोडकौतुक व्हायचं . डोकेदुखीचं निमित्त करून मी जर गोधडीवर आडवा झालो , तर लगेच माझ्या पुढ्यात समोरच्या इराणी हॉटेलातील पिवळाधमक मालपोहा यायचा . तात्काळ माझी डोकेदुखी थांबत असे . माझ्या आजारपणाची घरात टवाळी व्हायची . पण माझ्यावर कुणी रागावत नसे . असाच एकदा पगाराचा दिवस . दादांना आणि तात्यांना एकाच दिवशी पगार . मी सुटाबुटाचा हट्ट धरला . सूट घालण्याचं माझं वय नसावं . मी बहुधा सात – आठ वर्षांचा असेल . रडून आकांत केलेला . शेवटी मला पिलाहाउस इथं घेऊन जातात . एवढी भव्य , चकचकीत , काचेची दुकानं मी प्रथमच पाहत असतो . मला वुलनचा कोट , तशीच पैंट , पायात चकचकीत काळे बूट विकत घेतले जातात . घरी जाईपर्यंत मला दम नसतो . दुकानातच मी कपडे बदलतो . माझ्याकडे पाहून दादांना काय वाटतं , कुणास ठाऊक . त्या दिवशी सर्वांचा फोटो काढला जातो . हा फोटो बराच काळ मी जपून ठेवला होता . पण एवढ्या वीस – पंचवीस वर्षांत ‘ विंचवाचं बिहाड पाठीवर ‘ ह्या न्यायानं अनेकदा मुंबईत झालेलं स्थलांतर , ह्या गोंधळात फोटो केव्हाच गायब झालाय . एखाद्याचा अमोल खजिना लुटला जावा , असं मला आज वाटतं आहे . दादा , तात्या यांचा हा दुर्मिळ फोटो . तेवढीच स्मृती मी जपून ठेवू शकतोय . पण तोही क्षण काळाआड दडलाय . दादांचा चेहरा आजही आठवतो आहे , दादा काळे – सावळे , शिसवीसारखे , उंच , शेलाट्या अंगाचे . त्यांचा पोशाख तसा भपकेबाज . पांढरेशुभ्र मसराईचं उंची धोतर , वुलनचा कोट . डोक्यावर उंच , काळी गंधर्वछाप टोपी . छान हसायचे . हसताना त्यांच्या दातावरची एक सोन्याची मेख लकाकायची . तसं त्यांना लिहिता – वाचता येत नव्हतं . पण फोटो काढताना त्यांनी हाती जाडजूड ग्रंथ घेतलेला . कोटाच्या खिशाला पेन लटकावलेलं . तात्या तर खूपच राजबिंडे . मागे केस वळवलेले . अप टु डेट राहायचे . सुरुवातीला तालमीत जात . दांडपट्टा , काठी – लाठी खेळत . दांडपट्यानं लिंबाचे सहज दोन भाग करीत . त्यांच्या गळ्यात काळ्या दोऱ्या , ताकदीचा ताईत बांधलेला असायचा . आजी मात्र खूपच भाबडी . गोष्टीवेल्हाळ . तिचं नाव देवकी . ऐन उमेदीत नवरा वारलेला . तिनं मोठ्या धैर्यानं रांडपण पार पाडलेलं . कोंड्याचा मांडा करून तिनं आपली दोन मुलं रजाचा गज केलेली . तिला जर विचारलं , ” आजे , तू कवा गं ममईला आलीस ?
क्रमशः
