श्रीगोंदा पंचायत समितीत “नेतेगिरीचा पोशाख” परिधान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईची मागणी.

दिनांक २५ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पंचायत समिती सध्या विविध विषयांवरून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कालच नरेगा विभागाच्या गैरव्यवस्थापनाविरोधात गाई-गुरांसह धरणे आंदोलन झाले होते. आता पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्याने शिस्तभंगाचे धाडस दाखवल्यामुळे पंचायत समितीत नवा वाद उफाळून आला आहे.

युवा नेते प्रमोद राजेंद्र म्हस्के यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार पंचायत समितीतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र, श्रीगोंदा पंचायत समितीत याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.

विशेषत: अधिकाऱ्यांनी वेळेवर कार्यालयात हजर न राहणे आणि शासनाच्या नियमांचे पालन न करता विविध प्रकारचे पोशाख परिधान करणे, हे नियमभंगाचे ठळक उदाहरण आहे. वरिष्ठ अधिकारी येणार असल्याचे लक्षात आल्यावरच संबंधित अधिकारी ओळखपत्र परिधान करतात, अन्यथा नियमांकडे दुर्लक्ष करतात.

म्हस्के यांच्या निवेदनात असेही नमूद केले आहे की, शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याने कार्यालयात ठरावीक पोशाख परिधान करणे व ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे. तथापि, पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी हे नियम न पाळता अनियंत्रित वर्तन करत आहेत, ज्यामुळे शिस्तीचा अभाव दिसून येत आहे.

शिस्तबद्धतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाचे पालन करण्याचे आदेश देण्यात यावेत आणि जर कोणी अधिकारी किंवा कर्मचारी जाणूनबुजून नियमांचे उल्लंघन करताना आढळले, तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जाहिरात..

स्त्रोत:(निवेदन)

जाहिरात..

Leave a Reply