शिंदे वाडा संवर्धनाची मागणी : महादजी शिंदे स्मृतीदिन साजरा..

दिनांक १३ फेब्रुवारी २०२६,श्रीगोंदा:

श्रीगोंदे शहराचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या श्रीमंत महादजी शिंदे यांचा स्मृतीदिन १२ फेब्रुवारी रोजी शिंदे वाड्यासमोर साजरा करण्यात आला. या वेळी उपस्थित इतिहासप्रेमींनी वाड्याच्या जतन व संवर्धनाची जोरदार मागणी केली. शिवदुर्ग संवर्धन समितीच्या वतीने वाड्याच्या भव्य प्रवेशद्वाराचे पूजन करून या ऐतिहासिक वास्तूच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प करण्यात आला.

शिंदे घराण्याच्या राजवटीत श्रीगोंदे गावाचा व्यापक विकास झाला. त्या काळात गावात मजबूत वाडे, तटबंदी, वेसी आणि भव्य मंदिरे उभारली गेली. मात्र, या वारशाची आज मोठी उपेक्षा होत आहे. दोन मजली भव्य शिंदे वाडा दुर्लक्षित अवस्थेत असून, त्यात मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली आहेत. नियमित स्वच्छता होत नसल्याने वाड्याची पडझड वेगाने सुरू आहे. पावसाळ्यात विशेषतः शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वाड्याची अवस्था आणखीच बिकट झाली आहे.

वाड्याच्या जतनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. वाड्याच्या आतमध्ये वाढलेल्या झाडाझुडपांची स्वच्छता करावी, तसेच शाळेच्या प्रशासनाने माती टाकून बंद केलेला दरवाजा पुन्हा उघडावा, अशी मागणी करण्यात आली. या वास्तूला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करून येथे शिंदे घराण्याच्या इतिहासाची माहिती दर्शविणारे फलक लावण्यात यावेत, अशीही मागणी उपस्थित इतिहास प्रेमींनी केली.

या वेळी इतिहासप्रेमी मंडळाचे डॉ. विक्रम कसरे, निखील भागवत, शिवाजी साळुंके, अरविंद कासार, मनोज शिंदे, विनोद डोळस, प्रवीण मचाले, बापू गोसावी, शिवदुर्ग संवर्धन समितीचे राजेश इंगळे, ॲड. गोरख कडूस, दक्ष नागरिक फाउंडेशनचे दत्ताजी जगताप, श्रीरंग साळवे, प्रतीक घाटे, संदीप चाकणे, बाळासाहेब लवांडे आदी उपस्थित होते.

शिंदे वाड्याचा इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी या स्मृतीदिनानिमित्त सर्व स्तरांतून करण्यात येत आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading