दिनांक १४ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील लिंपणगाव येथील रहिवाशी राघु जगताप यांच्या मुलाचा दिनांक १ जानेवारी २०२४ च्या मध्यरात्री अपघाती मृत्यू झाला होता. त्यांनतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ३ जानेवारी रोजी तक्रार दाखल होऊन भादवी कलम ३०४(अ) सह मोटार वाहन अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीसांनी मयत अनिकेत राघु जगताप यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक्टर आणि इनोव्हा या दोन्ही वाहनांना ताब्यात घेत कारवाई केली होती. मात्र पोलीसांच्या कारवाईवर पिडित राघु जगताप आणि कुटुंबाने आक्षेप घेत दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ वार सोमवार पासुन विविध मागण्यांसंदर्भात श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोरं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्याचा तिसरा दिवस असुन, आजपर्यंत मागण्यांची पूर्तता झाली नसल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे.
पोलीसांनी सत्य घटनेनुसार गुन्हा दाखल करावा, ईनोव्हा गाडीचा मालक विनय भोसले वर मुलाच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, फिर्यादीच्या अज्ञान पणाचा गैरफायदा घेत दबाव वापरून खोटी फिर्याद लिहून मुलाच्या हत्येचा पुरावा नष्ट करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे, अनन्या हॉटेल मालक महेश शेंडगेवर कारवाई करावी, आदेश नागवडेवर गुन्हा दाखल करण्यात यावा.. सह मयत अनिकेत राघु जगताप यांच्या हत्येचा तपास सी आय डी यंत्रने मार्फत करण्यात यावा.. अश्या विवीध मागण्यांसह पिडित कुटुंब श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोरं मागील तीन दिवसांपासून आंदोलन करीत आहे.
जगताप कुटुंबाला सहकार्य करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या निलेश गायकवाड यांच्या सोबत पदाधिकाऱ्यांनी आज श्रीगोंद्याचे तहसिलदार यांना निवेदनाद्वारे कळविले आहे की, अद्यापपर्यंत प्रशासनाने उपोषण कर्त्याच्या मागण्यांचा कोणताही विचार केलेला नाही. यामधून श्रीगोंदा पोलीस स्टेशन व शासकीय प्रशासनाचा नाकर्तेपणा दिसून येतो. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्यापासून उपोषनातील मागण्या मंजूर होणेकामी ढोल बजाव, बोंबाबोंब या स्वरूपाचे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी. तर, या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर निलेश गायकवाड, ॲड. वसंत शिंदे, सचिन घोडके, गणेश सांगळे, भीमराव घोडके, सर्जेराव गायकवाड, नितिन जावळे, आबा रामफळे, सुहास ओहोळ, बबलू ओहोळ, किरण अढाव, भगवान ओहोळ यांनी स्वाक्षऱ्या केल्या असुन, विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
पोलिसांचे मत:
या प्रकरणी मयताच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसारच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील ताब्यात असलेली वाहनं कायदेशिर आदेशानेच सोडण्यात आली आहेत. कोणाच्याही दबावाला बळी पडून पोलीस गंभीर गुन्ह्यात कधीच कामं करीत नाहीत. होणारी कारवाई कायद्याच्या चाकोरीत पार पाडावी लागते.
स्रोत:(आंदोलन, निवेदन आणि मिळालेली माहिती)
