दिनांक २४ फेब्रुवारी २०२६,श्रीगोंदा:
राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधी पान मसाल्याविरुद्ध श्रीगोंदा तालुक्यात पोलिसांच्या कारवायां सुरू असतानाच, आज मंगळवारी सायंकाळी एक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुटख्याने भरलेला एक ‘जीत’ टेम्पो ताब्यात घेतला, मात्र त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता तो सोडून दिल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अधूनमधून गुटख्यावर कारवाया होत असतात. स्थानिक पोलिसांच्या कारवाया थंडावल्या की जिल्हा पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक (LCB) सक्रिय होते.
मात्र, आज सायंकाळी पोलीस ठाण्यात संशयास्पद स्थितीत आणलेला एक टेम्पो कोणत्याही गुन्ह्याशिवाय बाहेर गेल्याने नागरिक अवाक झाले आहेत.
अधिक माहितीनुसार, संबंधित टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी पान मसाला आणि बंदी असलेला गुटखा असल्याचे अधिकृतरीत्या समजले होते. असे असतानाही पोलिसांनी हा टेम्पो कारवाई न करता का सोडला? याबाबत शहरात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

टेम्पो आणि त्यातील मुद्देमाल एखाद्या बड्या नेत्याच्या कार्यकर्त्याचा होता का?
सदर कारवाई थांबवण्यासाठी पोलिसांना एखाद्या प्रभावशाली पुढाऱ्याचा फोन आला होता का?, अवैध धंद्यांना चाप लावण्याऐवजी पोलीस केवळ ‘अर्थपूर्ण’ तडजोडीत मग्न आहेत का?
एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक अवैध धंद्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचे आदेश देत असताना, दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र पकडलेली वाहने विना तक्रार सोडली जात आहेत. “संशयित वाहन पोलीस ठाण्यात आणूनही जर गुन्हा दाखल होत नसेल, तर कायद्याचा धाक उरला कुठे?” असा सवाल श्रीगोंदावासीय विचारत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, की हे प्रकरणही नेहमीप्रमाणे दडपले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
