दिनांक १५ एप्रिल २०२६, श्रीगोंदा:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आणि लेखणीतून महामानवाच्या कार्याला अभिवादन केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेबांच्या कार्याची सखोल माहिती व्हावी, या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
मानवी हक्कांची पायाभरणी’ या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावी निबंध सादर केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर विद्यार्थ्यांनी ओघवते वक्तव्य करून उपस्थितांची मने जिंकली.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे दर्जेदार साहित्य (पुस्तके) उपलब्ध करून देण्यात आले.
भविष्यात प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच जिद्दीने अभ्यास करावा, असा सूर या कार्यक्रमातून उमटला.
या कार्यक्रमाप्रसंगी वसतिगृह अधीक्षक श्री. प्रथमेश तावरे, संगीता आढाव, श्री. प्रवीण साळवे तसेच श्री. राजेश भराटे (श्री साई पब्लिकेशन, पुणे) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसतिगृहातील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ पुस्तकात न ठेवता ते आचरणात आणणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सक्षम करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
स्रोत: प्रशासन, शासकीय वसतिगृह श्रीगोंदा.
