दिनांक १५ एप्रिल २०२६,श्रीगोंदा/पुणे:
ग्रामीण भागातील गुणवत्ता आणि जिद्दीच्या जोरावर श्रीगोंदा येथील इंद्र विक्रम काळे याने राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे (MSME) आयोजित ‘आयडिया हॅकेथॉन ५.०’ या स्पर्धेत इंद्रने सादर केलेल्या सायबर सिक्युरिटी प्रकल्पाला केंद्र सरकारने १४.५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
इंद्र काळे हा पुण्यातील अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पर्वती) येथे संगणक अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याने आपल्या सहकारी विद्यार्थ्यांसह (अधिराज जगताप, पार्थ ताकाटे आणि वैभव शेळके) ‘उंब्रा साईट: अन एंड-टू-एंड डार्क वेब मॉनिटरिंग थ्रेट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म’ ही संकल्पना मांडली.
हा प्रकल्प प्रामुख्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सायबर गुन्ह्यांचा मुळापासून शोध घेणे.. इंटरनेटच्या अंधाऱ्या जगातील (Dark Web) संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे.. देशाच्या सायबर सुरक्षेला अधिक सुरक्षित आणि अभेद्य बनवणे यासाठी काम करतो.
‘स्टेल्थ सर्व्हेलन्स अँड सायबर डिफेन्स टेक्नोलॉजी’ या थीम अंतर्गत हा प्रकल्प सादर करण्यात आला होता. भारत सरकारचे MSME मंत्रालय आणि इंदिरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
देशभरातील हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागातून इंद्रच्या या प्रकल्पाची निवड करण्यात आली असून, त्याच्या व्यावसायिक वापरासाठी केंद्र सरकारने तात्काळ आर्थिक पाठबळ दिले आहे.
या यशात इंद्रला संगणक विभाग प्रमुख डॉ. रमा गायकवाड, जितेंद्र मुसळे आणि प्रांजली मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्रीगोंदा सारख्या ग्रामीण भागातून येऊन एका तरुणाने सायबर सुरक्षेसारख्या क्लिष्ट विषयात देशाला दिशा देणारे तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे, इंद्रवर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
स्रोत:(प्रसिद्ध पत्र)
