दिनांक ५ जुन २०२४,कोळगाव, श्रीगोंदा:
कोळगाव मध्ये आज दुपारी चारच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात विक्रेते व ग्राहक यांची तारांबळ उडाली. भाजी पाल्यामध्ये पाणी गेले, मालाची नासाडी झाली, अनेकांचा माल पावसामुळे भिजला. अचानक आलेल्या या पावसामुळे विक्रेते आणि ग्राहक यांची मोठी दैना उडाली.
दर बुधवारी कोळगाव येथे बाजार आठवडी बाजार भरतो. या बाजारात कोथुळ, ढोरजा, भानगाव, चिखली, कोरेगाव, सुरेगाव, उखलगाव पासूनचे विक्रेते व शेतकरी आपला शेतीमाल घेऊन बाजारात विक्रीसाठी येतात. दुपारी उकाडा निर्माण झाला होता. तापमानात वाढ झाली होती. सायंकाळी चारच्या सुमारास पश्चिमेकडून हलक्या व नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी विक्रेते व ग्राहक यांची धांदल उडाली. विक्रेत्यांना आपल्या शेतीमालाची आवरा आवर करावी लागली. काही विक्रेत्यांना आपला माल तेथेच सोडावा लागला.

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने कोळगावकरांचे बाजारात हाल झाले. पावसाबरोबरच माती वाहून येत असल्याने विक्रेत्यांसाठी बांधलेल्या ओट्यांच्या मध्ये चिखल तयार होतो. पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने पाणी तुंबून राहते. त्यामुळे सगळीकडे पाण्याचे छोटे मोठे डोह तयार होतात. बाजार तळावर पाच ते सहा ठिकाणी पाण्याची डबके तयार होतात. त्यामुळे सर्वांचेच नुकसान व हाल होते. ग्रामपंचायतने तातडीने याकडे लक्ष पुरवून सांडपाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून शेतीच्या मशागतीच्या कामांना यामुळे वेग येणार आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकरी तसेच नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
कोळगाव येथे आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने या बाजारात ग्रामपंचायतीने विक्रेत्यांसाठी कायमस्वरूपी शेड बांधावे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, पावसामुळे साठणारे पाणी बाजूला काढावे, ठिकठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. तेथील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी, विक्रेत्यांची बसण्याची व्यवस्था करावी.. अशी मागणी या बाजारातील विविध विक्रेत्यांनी केली आहे.
स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)
