दिनांक १० मार्च २०२६ श्रीगोंदा:
तालुक्यातील ढोरजे येथील एका ७८ वर्षीय वृद्ध अनुसूचित जातीच्या महिलेने जमिनीच्या वादातून आणि पोलीस प्रशासनाच्या अन्यायाविरुद्ध आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
वत्सला विश्वास भोईटे असे या महिलेचे नाव असून, त्यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचे सांगत पोलीस उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे दाद मागितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे ढोरजे येथील गट नंबर २४६ मधील वडीलोपार्जित महार वतन जमिनीबाबत गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. याबाबत न्यायालयाने खरेदीखत रद्द करण्याबाबतचा दावा (२३८/२०१६) अद्याप प्रलंबित आहे.

असे असतानाही, गैरअर्जदार हेमंत नलगे आणि संध्या नलगे (रा. कोळगाव) हे पैशाच्या आणि राजकीय वरदहस्ताच्या जोरावर या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वत्सला भोईटे यांनी केला आहे.

अर्जदार महिलेने बेलवंडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तक्रार देण्यासाठी गेल्या असता, संबंधित अधिकाऱ्याने तक्रार घेण्यास नकार दिला आणि अपमानित करून माघारी पाठवले, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

“न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य असेल, मात्र निकाल प्रलंबित असताना बळाचा वापर करून क्षेत्र ताब्यात घेतले जात आहे,” अशी व्यथा त्यांनी मांडली.
मुख्य मागण्या आणि इशारा:
बेकायदा कब्जा करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी., वारंवार मिळणाऱ्या धमक्या आणि शिवीगाळीपासून संरक्षण मिळावे., प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाचा आदर राखून स्थिती जैसे थे ठेवावी.

“मी ७८ वर्षांची असून पतीच्या निधनानंतर ही जमीन कसत आहे. मात्र, गुंडगिरी आणि राजकीय दबावामुळे माझ्यावर अन्याय होत आहे. जर मला न्याय मिळाला नाही, तर मला आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरलेला नाही.”
— वत्सला विश्वास भोईटे (अर्जदार)या प्रकरणी आता पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(निवेदन.. प्रसिद्धी पत्र)
