इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत

अहिल्यानगर, दि. ३ जुलै, २०२६ :

राज्यातील इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण आर्थिक व सामाजिक विकासासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच त्याच्या १३ उपकंपन्यांमार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी इतर मागासवर्गातील पात्र लाभार्थ्यांनी विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

महामंडळामार्फत २० टक्के बीज भांडवल कर्ज योजना, एक लाख रुपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना तसेच महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अशा एकूण सहा योजना राबविण्यात येत आहेत.

यापैकी एक लाख रुपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना तसेच महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना या पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येतात. पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रथम नावनोंदणी करून त्यानंतर ऑनलाइन अर्ज सादर करावा. २० टक्के बीज भांडवल कर्ज योजना ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून, या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा कार्यालयातून उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडी, नगर-मनमाड रोड, अहिल्यानगर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा (०२४१) २४५००३० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading