जिल्ह्यात नवीन २४३० आपले सरकार सेवा केंद्रांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

अहिल्यानगर, दि. ०३ :-

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ६ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत क्षेत्रातील २३४५, नगर पंचायत व नगर परिषद क्षेत्रातील ५४ तसेच महानगरपालिका क्षेत्रातील ३१ अशा एकूण २४३० केंद्रांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

ही अर्ज प्रक्रिया २२ जून २०२६ पासून सुरू झाली असून अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती https://ahilyanagaraaplesarkar.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे, तो किमान १२ वी उत्तीर्ण असावा तसेच त्याला मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. विवाहित महिलांनी विवाहानंतरचा रहिवासी पुरावा सादर करावा. एका अर्जदाराला केवळ एका ठिकाणासाठीच अर्ज करता येणार असून एकापेक्षा अधिक अर्ज आढळल्यास ते रद्द करण्यात येतील. शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांना या प्रक्रियेत अर्ज करता येणार नाही.

ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर त्याची एक प्रत छाननीसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा छायाचित्र, १२ वीचे गुणपत्रक, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, संगणक अर्हता प्रमाणपत्र तसेच पदवी उत्तीर्ण असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्जासाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्यास किंवा दिशाभूल केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तांत्रिक सहाय्यासाठी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक किंवा जिल्हा समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा तसेच इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तींशी आर्थिक व्यवहार टाळावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

छाननीनंतर पात्र उमेदवारांची अंतिम यादी २५ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. आयडी प्राप्त झाल्यानंतर केंद्र चालकाने दोन महिन्यांच्या आत सेवा केंद्र सुरू करणे अनिवार्य राहील. अन्यथा संबंधित केंद्राचा अधिकार रद्द करण्यात येईल. सेवा केंद्राच्या दर्शनी भागात केंद्राचे स्वरूप, उपलब्ध सेवा व दरपत्रक प्रदर्शित करणे बंधनकारक असून शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यास संबंधित सेवा केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात येईल, असेही प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply