संभाजी ब्रिगेड पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुखपदी इंजि. शामभाऊ जरे…


दिनांक ४ ऑगस्ट २०२६, श्रीगोंदा:

संभाजी ब्रिगेड पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला बळकटी देण्यासाठी श्रीगोंदा तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांना अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अहिल्यानगर येथे झालेल्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. अण्णासाहेब सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष मा. राजेश दादा परकाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

इंजि. शामभाऊ जरे यांनी श्रीगोंदा तालुक्यात सामाजिक, संघटनात्मक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे. नगरपरिषद, पंचायत समिती व इतर शासकीय कार्यालयांतील नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलने, धरणे, मोर्चे, निवेदने आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, सार्वजनिक आरोग्य सुविधा, शिक्षण, युवकांचे प्रश्न तसेच प्रशासनातील पारदर्शकतेसाठी त्यांनी वेळोवेळी भूमिका घेतली आहे.

स्पर्धा परीक्षांतील कथित गैरप्रकार, विविध विभागांतील कथित भ्रष्टाचार, जनतेच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तसेच सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व युवकांचे संघटन करण्यासाठीही त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.

त्यांच्या या सामाजिक, संघटनात्मक आणि आंदोलनात्मक कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे.

नियुक्तीनंतर इंजि. शामभाऊ जरे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, “पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे, संघटना अधिक सक्षम करणे आणि जनतेच्या न्याय्य प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे लढा देणे, हेच माझे ध्येय राहील,” असे सांगितले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading