दिनांक ५ ऑगस्ट २०२६:
नगरपालिका निवडणूक होऊन आता जवळपास सहा महिन्यांचा काळ लोटला आहे. निवडणुकांचे राजकारण संपले असले तरी, निवडणुकीच्या काही दिवस आधी घडलेली ही खळबळजनक घटना अद्यापही नागरिकांच्या स्मरणात असून त्यावरून शहरात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काही आजी-माजी नगरसेवक आणि त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी शहरानजिकच्या वनक्षेत्रात (फॉरेस्ट) संरक्षित प्रजाती असलेल्या हरणाच्या मटणाची पार्टी केल्याची कुजबूज पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, नगरपालिका निवडणुकीच्या काही दिवस आधी रणधुमाळीची रणनीती आखण्यासाठी आणि गुप्त बैठक करण्यासाठी काही नगरसेवक व त्यांचे काही खास सहकारी शहरानजिकच्या जंगलात एकत्र जमले होते. सुरुवातीला निवडणुकीचे नियोजन रंगले, मात्र हळूहळू बैठकीचे स्वरूप पार्टीत बदलले. सूत्रांच्या माहितीनुसार, याच पार्टीत बेकायदा संरक्षित वन्यप्राणी असलेल्या ‘हरणाचे मटण‘ शिजवण्याचा बेत आखण्यात आला.
ही पार्टी रंगात आलेली असतानाच, उपस्थितांपैकीच किंवा जवळच्याच कोणातरी व्यक्तीने याची कुणकुण वनविभागाला दिली होती. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन छापा टाकला होता. तेथून जप्त केलेले मटणाचे नमुने खात्री करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले होते.
चर्चेनुसार, या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ते मटण हरणाचेच असल्याचे निष्पन्न (पॉझिटिव्ह) झाले होते. मात्र, नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतरही कारवाई थंडबस्त्यात का पडली.? अधिकारी मॅनेज केले गेले का.? असे अनेक गंभीर प्रश्न या निवडणुकीला सहा महिने पूर्ण होत असताना पुन्हा एकदा नागरिकांमधून उपस्थित होत आहेत.

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संरक्षित असलेल्या प्रजातीची शिकार करणे किंवा त्याचे मांस बाळगणे व सेवन करणे हा अत्यंत गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असतानाही, राजकारणात वावरणाऱ्या या मंडळींना कायद्याचे भान कसे राहिले नाही.? असा सवाल विचारला जात आहे.
निवडणुका होऊन सहा महिन्यांचा काळ लोटला असला, तरी या कथित हरण मटण पार्टीत नेमके कोणकोणते नगरसेवक व त्यांचे सहकारी सामील होते, याची चर्चा अद्यापही सुरू आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
