हंगेवाडीची सुसज्ज ज्ञानमंदिर..

श्रीगोंदा तालुक्याच्या पश्चिम टोकाला हंगा नदीकाठावर वसलेले हंगेवाडी हे साधारत: सहा हजार लोकसंख्येचे गाव. हंगेवाडी पंचक्रोशातील १९४१ साली गावात सुरु झालेली शाळा. ग्रामस्थ व पालक पहिल्यापासून शिक्षणासाठी उत्साहित होते. याच प्रयत्नातून स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु झालेली शाळा आज नावारुपाला आली.

स्वातंत्र्यपूर्व काळात १९४१ साली हंगेवाडी गावात शाळा सुरु झाली. आजपर्यत शाळेचा पट कायमच तीनशेच्या वर राहिलाय. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शाळेला नवीन इमारत मिळाली. वाड्यावस्तीवरील मुले ३ ते ४ किलोमीटर अंतरावरून शाळेत येतात. शाळेतील भौतिक सुविधांची सुरूवात करताना लोकसहभागातून २०१५ मध्ये शाळेत पाणी फिल्टर बसवले. विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात येत आहे. त्यानंतर शालेय क्रीडांगण दुरुस्त करुन त्यावर विविध आकर्षक खेळण्या बसविण्यात आल्या. खेळाची मैदाने आखली व त्यातून मुलांच्या बौध्दिक विकासाबरोबरच शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी एक पाऊल उचलले.

शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांपैकी शैक्षणिक स्नेहसंमेलन हा उपक्रम महत्वाचा ठरला. २०१६ साली पहिल्यांदा स्नेहसंमेलन घेतले गेले. यावेळी पालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मुलांचे कलागुण पाहून पालकांनी तब्बल १ लाख ५४ हजार रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव केला. या निधीमधून शाळेला आकर्षक रंगसजावट करण्यात आली. यामुळे बोलक्या भिंती तयार झाल्या. शाळेसाठी सुसज्ज संगणक कक्ष, एलसीडी प्रोजेक्टर बसविण्यात आला. त्यातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण पध्दतीने मुलांना अवघड अभ्यासविषयक घटक समजून देण्यात येऊ लागले. शाळेचा शैक्षणिक दर्जा निश्चितच वाढण्यास मदत झाली.

२०१७ मध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलातून शाळेस महाराष्ट्र बँक, महेश्वर मल्टिस्टेट व गावातील दानशूर व्यक्ती यांच्याकडून तब्बल १० एलईडी मिळाले. त्याव्यतिरिक्त २ लाख ४२ हजार रोख देणगी मिळाली. या रकमेतून शाळेसाठी रंगमंच, सायकल, सायकल स्टँड, अद्ययावत मुला – मुलींची शौचालये, वृक्षारोपण, वगार्ची अंतर्गत सजावट कामे करुन शाळेचे रुप पूर्णपणे बदलून टाकण्यात आले. जिल्हा पातळीवरील विविध वैयक्तिक व सामुहिक स्पर्धात शाळेचे विद्यार्थी चमकतात. धनश्री दिलीप वाळुज नवोदय प्रवेश परीक्षेत पात्र ठरली. वक्तृत्व, हस्ताक्षर, कथा सादरीकरण या स्पर्धात शाळेचे विद्यार्थी जिल्हा पातळीवर चमकले. सांस्कृतिक स्पर्धेत लहान व मोठ्या दोन्ही गटात हंगेवाडी शाळा तालुक्यात अवल ठरली. तर मोठा गट जिल्ह्यात तिसरा आला. शाळेची उपक्रमशीलता पाहून अहमदनगर जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे यांनी शाळेस भेट देऊन शिक्षकांची पाठ थोपटली. त्यानंतर विश्वजित माने यांनीही शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले.

या शैक्षणिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र शाळेच्या वैभवात भर टाकणारेच ठरले. या विज्ञान केंद्रातील गणित व विज्ञानविषयक वैविध्यपूर्ण प्रयोगसाहित्य हाताळत आहेत. प्रयोग करणे, निष्कर्ष काढणे हा मुलांसाठी आनंददायी अनुभव आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाटी शाळेत नवनवीन उपक्रम राबविले जातात. माझा वाढदिवस माझी भेट, सप्तरंगी परिपाठ, दप्तरमुक्त शाळा, प्लॅस्टिकमुक्त शाळा, विद्यार्थी सूत्रसंचालन असे उपक्रम राबविले. मुले पुस्तकांचा संच एक घरी आणि दुसरा शाळेत ठेवतात. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी झाले.

शाळेच्या जडणघडणीत समाजाला शाळेचा अभिमान वाटावा असा ग्रामस्थांनी लोकसहभाग दिला. प्रत्येक कामात पालकांचा सहभाग असतो. शाळेस भरभरून आर्थिक सहकार्य करण्यास हंगेवाडी परिसर कधीही माघार घेत नाही. केवळ गावातील दानशूर पालक व त्यांच्या समाज सहभागातून शाळेचा विकास शक्य झाला आहे.

शब्दांकन : पांडुरंग रायकर, न्युज, प्रतिनिधी.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा कायमच खंबीर पाठींबा असतो. शाळेमध्ये लोकसहभागातून अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत. शिक्षक व इतर कर्मचारी कायमच विद्यार्थीहित समोर ठेवून काम करत आहेत. कांतीलाल वैराळ, मुख्याध्यापक

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading