दिनांक ८ डिसेंबर २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे शोभेच्या दारूच्या कार्यक्रमादरम्यान किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सहा आरोपींनी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या पाठीत धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना ५ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री घडली आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या योगेश नंदु रायकर या तरुणाच्या उजव्या बाजूची किडनी (मूत्रपिंड) गंभीर जखमी झाल्यामुळे ती काढावी लागली असून, हल्लेखोरांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी संदीप रायकर (रा. मांडवगण) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२:१५ वाजता झालेल्या भांडणाचे कारण होते. त्यानंतर परत रात्री ०१:१५ वाजता गावातील शोभेची दारू व पालखी मिरवणूक कार्यक्रम सुरू असताना,स्माशानभूमीजवळील शोभेची दारू उडवण्याच्या ठिकाणी परमेश्वर बाळासाहेब आंनदकर यांचा गर्दीत धक्का लागला. या धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला.
याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादीचा भाऊ योगेश नंदु रायकर आणि त्याचे मित्र मयुर बोरुडे व किरण बोरुडे हे झेंडा चौक, मांडवगण येथे गेले होते.

झेंडा चौकात हजर असलेल्या सहा आरोपींनी योगेश रायकर यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. या मारहाणीदरम्यान, आरोपींपैकी साहील मच्छीद्र चव्हाण याने त्याच्या हातातील धारदार हत्याराने योगेश नंदु रायकर याच्या पाठीत उजव्या बाजूला वार केले.
या जीवघेण्या हल्ल्यात योगेश रायकर यांची एक किडनी (मूत्रपिंड) गंभीररित्या निकामी झाली असून, डॉक्टरांना ती शस्त्रक्रिया करून काढावी लागली आहे. हल्लेखोरांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संदीप रायकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून, प्रशांत साहेबराव चव्हाण, साहील मच्छीद्रं चव्हाण, सुयोग मच्छीद्रं चव्हाण, सुरज संतोष चव्हाण, हेमंत चव्हाण (पूर्ण नाव माहीत नाही), अविनाश उर्फ पप्पु शामराव चव्हाण (सर्व रा. मांडवगण) या सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
