फकिरा..
सर्व गपकन थांबले . पंत घोड्यावरून उतरून जवळ गेले नि म्हणाले , असं ” ह्या जोगणीवर मालकी हक्क या जिवाचा आहे . त्यांना दर्शन घेऊ द्या ! ‘ म्हणून पंत राहीबाई , राधा यांच्याजवळ जाऊन म्हणाले , ” हं , काकू , पाया पडा , ही तुमची जोगणी ! “
राही व राधा गोंधळून गेल्या . काय बोलावं , हे त्यांना सुचेना . मग पुन्हा पंत पुढे झाले . त्यांनी फकिरा , साधू यांना जोगणी दिसावी , म्हणून हातानं धरून पुढं आणलं . मग दोघांनी हात जोडले आणि ‘ चला ‘ अशी पाटलानं हाक दिली . पुन्हा सर्व वाद्यं वाजू लागली . आळीपाळीनं जोगणी फिरत फिरत दिवस बुडता बुडता परत आली आणि विसर्जन पावली. विष्णुपंत आणि पाटील यांच्या शिरावरचा बोजा हलका झाला. गावानं सुटकेचा निःश्वास टाकला. बापू खोत आला नाही किंवा आला असला, तरी त्याचं काही चाललं नसावं . जोगणीत विघ्न आलं नाही. ‘ पहिली जोगणी सुखरूप पार पडली. आता पुढचं कोणी पाहिलं ? ‘ असं म्हणत लोक घरोघर परतले.
आपल्यासाठी पंतांनी जोगणी उभी केली, या विचारानं राधा पुलकित झाली. त्या प्रसंगानं ती सर्व दुःख विसरली.
पंतांच्या शब्दांनी राहीबाईला धीर आला. मुलगा मेला, पण चीज झालं, असं तिला वाटलं. गोड शब्दांनी मनाला फुलोरा येतो .
आणि दौलतीनं तर एक वर्षानंतर आजच मिशीला पीळ भरला होता.
आषाढाच्या मध्यावर पावसानं भलताच जोर धरला. मांग उपाशी मरू लागले. दौलतीच्या बाबतीत गावानं हात सैल सोडला होता; परंतु बाकीचे नादार होते. त्यांना कोणीच धनी नव्हता. त्यांची ती उपासमार सावळा मांगाला बघवेना. तो भर पावसात बाहेर पडला. भैरू रामोशी आणि सावळा दोघांनी आसपासच्या रानात उत्पात मांडला. त्यांनी शिगावावर करडी कमान धरली. या लुटालुटीत खोत हैराण झाला. चार महिन्यात तो हंबकुटीला आला आणि सातारला गेला. त्यानं प्रांतसाहेबांची भेट घेऊन सावळा मांगाचं नाव दाखल केलं.
सावळाची ख्याती प्रांताच्या कानावर आली होती. त्यानं विष्णुपंत कुलकर्त्यांना पत्र देऊन शिपाई वाटेगावला दामटला . पत्रात लिहिलं होतं:
‘तुमच्या गावचा सावळा दाजी मांग यास साताऱ्यास पाठवावे. आम्हाला त्याच्याशी काही बोलायचे आहे. ‘ हे पत्र ऐकून सावळा चरकला. “ दगाफटका होणार, मी साताऱ्याला जात नाही ” असं तो पंतांकडे म्हणाला . ” पण ‘ बोलावयाचे आहे ,
धरावयाचे नाही ‘ असं पत्र आहे, तेव्हा तू जा ! जर काही वाईट झालं , तर मी साताऱ्यास येईन ! ” असं पंतांनी सांगितलं , तेव्हाच सावळा साताऱ्याला गेला . कचेरीत खोताला पाहून त्याला संशय आला , की प्रांताचं पत्र खोताच्या गा – हाण्यामुळं आलं असावं.
प्रांतानं सावळ्याला नीट पाहून घेतला. त्याचा थाटमाट, कु – हा हा नक्कीच चोर असावा, अशी त्याची खात्री झाली ; पण हा भलताच बोलका आहे, हे त्याला नंतर उमजलं.भेटीत प्रांतानं पहिलाच सवाल केला,
‘तुमच्या गावाशेजारी इंग्रजी हद्दीत भाटवाडी येथे परवा खून झाला आहे, त्याची आम्हाला माहिती हवी आहे. ” हे ऐकून सावळा हसत म्हणाला, ” जर रोज दोन कोंबड्या खानाऱ्या तुमच्या अंमलदार लोकांस्नी त्या खुनाची बातमी लागत न्हाय , तर ती माझ्यावानी पाला खानाराला कशी कळनार ? आनी त्यो खून काय मला सांगून कुनी केला न्हाय- “
” तू जास्त बोलतोस. ” प्रांत मध्येच म्हणाला, ” जेवढं आम्ही विचारू , तेवढंच बोल. “
” मला मोजकं बोलता येत न्हाय, सरकार- “
” म्हणजे बेलगाम बोलता आणि वागता येतं- असंच ना ? तो खून तुम्ही मांगांनी केला आहे. “
” असं कोन म्हनतं ?” सावळा तापून म्हणाला, ” मांग कधीच कुनाचा खून करीत न्हाय ! कनसं खुडून प्वाट भरतं , तसं मुंडकं मारून भरत न्हाय , मुंडकी मारायचं काम ह्या खोतावानी दांडगेसराचं , आमचं नव्हं ! ” सावळानं खोताकडे बोट दाखवून म्हटलं आणि खोत गोरामोरा झाला ! परंतु गप्प बसला . प्रांत भडकून म्हणाला ,
” आपला गुन्हा दडावा , म्हणून दुसऱ्याचं नाव घेऊ नको . तुला अटक करीन ! “
” करा की अटक ! ” सावळा दाबात बोलला , ” गुन्हा माझ्याजवळ काढा . तुम्ही साप म्हून भुई थोपटायला लागला , सरकार , पर मी मिशी काढून दीन – मांग खून करीत न्हाय . मानसं मारून आमचं प्वाट भरत न्हाय . उलट मानसं जगावी , त्येंनी शेती पिकवावी आन् आम्ही शेंडागोंडा आनून जगावं , असंच आमास्नी वाटतं ! “
” म्हणजे तुम्ही उभा पिकांची लूट करता ? “
” हो – हे मातर खरं हाय ! “
” तुम्ही शिगावचं रान बेचिराख केलं ! ” प्रांतानं आपली सरबत्ती सावळ्यावर सुरू केली , “ एका मांगाचं जोगणी पळवीत असताना खोतानं शिर मारलं , त्याचा सूड म्हणून तुम्ही शिगावची पिकं ओरबाडून घेत असता . खरं ना हे ? “
” आता तुम्ही खरं बोलला . ” सावळा लटकेच हसत म्हणाला , ” खोतानं – गाहानं घातलं , म्हणून तुम्ही मला बोलावनं केलंया , हे आता उघड झालंय . आम्हाला रानूजीचा सूड घियाचा असता , तर खोताचं डोस्कं काय कुलपात नव्हतं . कुटंबी मारलं असतं , आनी- “
” आणि काय ? ” ” आनी अजून बी खोतानं आमची जोगणी परत न्हीयाला यावं , जाग्यावरच मुंडकं न्हाय मारीन , तर मांगाची अवलाद न्हवं ! आनी अवलादीला हेच सांगून मी मरनार ! “
” तू घमेंडखोर आहेस ! ” ” खरं हाय , सरकार ! “
” प्रांताची वेळ झाली . उद्या बोलू ” , असं सांगून प्रांत आपल्या कामाला गेला आणि खोताकडे तिरप्या नजरेनं पाहत सावळा धर्मशाळेत वस्तीला गेला .
त्या रात्री शिगावहून खास माणूस एक खबर घेऊन आला, की खोताचा साराच्या सारा ऊस जळून राख झाला . सकाळी खोताचा ऊस जळाल्याची बातमी ऐकून दक्षिण साताऱ्यात होत असलेल्या लुटालुटीशी सावळ्याचा संबंध नसून दुसरंच कोणी तरी आहे , अशी खात्री होऊन प्रांतसाहेबानं सावळ्याला जाण्याचा हुकूम दिला आणि मिशीला पीळ मारीत सावळा गावात आला .
सावळ्याला अटक होणार, अशी सर्वांची खात्री झाली होती. त्यांना सावळ्याला पाहून आनंद झाला. सावळा आला, तो थेट पंतांना भेटायला चावडीवर गेला. सांज होत होती . दिवसभराचं काम आटोपून पंत वाड्याकडे निज्ञाले आणि सावळ्यानं मुजरा ठोकला . मग दोघे बोलत बोलत वाड्याकडे निघाले . चालता चालता प्रांत काय म्हणाला , आपण काय बोललो , हे सारं त्यानं पंतांना सांगितलं . ते ऐकून पंत म्हणाले ,
” मग तुला सातारचं बोलावणं करण्याचं कारण काय ? “
” कारन बिरन काय न्हाय- ” ” खोतानं कागाळ्या सांगून सरकारचं डोस्कं उठवलंया .
” सावळा वाड्यापुढं थांबून म्हणाला , .’असं कशावरून?
“खोतानं रानूजीचं डोस्कं मारलं, म्हनून आम्ही सूड घेतोय, असं प्रांत म्हनीता , म्हनून म्हनतो . ‘
” ठीक आहे. तिथं राणोजीचं नाव निघालं होतं ? “
“ नाव न्हाय, पर एका मांगाचं डोस्कं मारलं , म्हनून तुम्ही लुटालुट करता , असा म्हनीता प्रांत ! “
” बरं . तू जा आता आणि आता सावध राहा ! परक्या हद्दीत सापडू नको ! ” पंतांनी गंभीर चेहरा करून सूचना दिली . पंत वाड्यात गेले आणि सावळा घराकडे निघाला. वाटेत भैरू रामोशी भेटला. सावळाला पाहून तो म्हणाला, ” सावळा , हात मोडल्यावानी वाटत व्हतं , बघ!
” पर , भैरू , आता हात मोकळं व्हातील , असं वाटंना रं! “
” कारं ? काय भानगड झाली ? “
” सरकार जागं झालं . खोतावानी बडी मानसं सरकारकडं गा हानी गात बसल्याती . काय तरी यडंवाकडं व्हनार , असा रंग दिसाया लागलाय ! “
” पंतांनी काय सांगितलं ? “
” हद्दीच्या भाईर जायचं न्हाय नि सापडायचं न्हाय ! “
” असं जर पंत म्हनत्यात , तर नक्कीच भानगड हाय!”
बोलत बोलत ते मांगवाड्यापाशी येऊन पोचले , तेव्हा भैरू सावळ्याच्या कानात हळूच पुटपुटला , ” खोताचा ऊस म्याच फुकून दिला ! ” ते ऐकून सावळा हसला आणि म्हणाला , ” बरं केलंस. म्हनूनच माझी मान मोकळी झाली ! ” असं म्हणून तो गडबडीनं घराकडे निघाला.
आणखी पंधरा दिवस उलटले नाही , तोच संस्थानी सरकारचा हुकूम घेऊन इंग्रजी पोलीस गावात दाखल झाला. तो हुकूम पाहून पंत, पाटीत आणि गाव चकित झाला. मांगवाड्यावर पुन्हा संकटच आलं, पंतांनी तो हुकूम चावडीत जरा मोठ्यानं वाचला
” तुमच्या गावच्या मांग जमातीनं इंग्रजी हद्दीत शिरून जो उत्पात मांडला आहे, त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था राखणेसाठी हा हुकुम रवाना होत आहे . या हुकुमान्वये सावळा दाजी मांग यास बेळगाव येथे स्थानबद्ध करण्यात येत आहे . तरी त्वरित हुकूमाची अंमलबजावणी व्हावी व आरोपीस हा हुकूम घेऊन येणाऱ्या सरकारी नोकराचे स्वाधीन करावे. जर आरोपी आपली बायकामुलंही बरोबर घेऊ इच्छीत असेल, तर त्याला सरकारची आडकाठी नाही “
हा हुकूम वाचून पंतांनी चावडीत बसलेल्या सर्व प्रतिष्ठित मंडळीचे चेहरे निरखले आणि तो कागद शंकरराव पाटलांकडे भिरकाविला .
” पन गुन्हा काय मांगाचा ? ” पाटील रेखीव आवाजात म्हणाला आणि समोर पडलेल्या त्या कागदाकडे बोट करून पंत म्हणाले,
“त्या हुकमाला विचारा.
” हे सरकारी धोरन माझ्या डोस्क्यात येत नाही.”
“येण्यासारखं नाहीच मुळी ते . माणूस म्हणजे दगड नव्हे. त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध केव्हाही आणि कुठंही नेऊन ठेवणं हा अन्याय आहे आणि तो अन्याय या हुकमात आहे . आजा सावळ, उद्या दौलती , परवा बहिरू- “
” परंतु याचा परिणाम ? “
“परिणामाची पर्व सरकार करीत नाही, हे स्पष्ट झालं आहे . मात्र परिणाम होणार, यात शंका नाही ! गावगाडा मंदावेल , गावचे कारभार थंडावतील, प्रांतातील मांग लोक उठावणी करतील आणि ती ” शब्द पंतांनी परत गिळून टाकले.
क्रमशः
स्रोत:(फकिरा या अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतुन)
