“श्रीगोंद्यात ५० हजार नागरिकांची आर्थिक फसवणूक; आमदार-खासदार गप्प का? – राजेंद्र म्हस्के यांचा उपोषणातून सवाल!”

शेअर मार्केटच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट; आरोपींच्या अटकेसह गुंतवणूकदारांना परतावा मिळावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण..

दिनांक १५ जुलै २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा, पारनेर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने गोरगरिबांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख आरोपी नवनाथ अवताडे व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करावी, गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत, या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणात बोलताना म्हस्के म्हणाले की, सिस्पे, इन्फनाईट बिकॉन यांसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून त्यांची फसवणूक झाली.

मुख्य आरोपी नवनाथ अवताडे याच्यासह अगिस्ती मिश्रा, ययाती मिश्रा, शुभम अवताडे, गौरव सुखदेवे, राहुल काळाखे, प्रसाद कुलकर्णी, विनायक मराठे, सचिन खडतारे, ओंकार भुसारे, संदीप दरेकर, संदिप रोडे, पांडुरंग खामकर, भरत खामकर, झुंझार इत्यादींनी मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

या प्रकरणात गुंतवणूकदारांनी कर्ज काढून गुंतवणूक केली, मात्र त्यांना ना परतावा मिळाला ना मूळ रक्कम. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ही लढाई आता रस्त्यावर उतरून लढावी लागते आहे, असेही त्यांनी सांगितले. उपोषणस्थळी राजकीय व सामाजिक नेत्यांनी पाठिंबा देत भेटी दिल्या असून, फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार – म्हस्के
श्रीगोंदा तालुक्यात जवळपास ५० हजार नागरिकांची फसवणूक झाली असून, हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती म्हस्के यांनी दिली.

“खासदार-आमदार गप्प का?” – राजेंद्र म्हस्के यांचा सवाल
या कंपन्यांच्या उद्घाटन प्रसंगी आमदार आणि खासदार उपस्थित होते, मग आता आरोपींविरोधात आवाज का उठवत नाहीत? असा सवालही राजेंद्र म्हस्के यांनी उपस्थित केला.

स्रोत:(आमरण उपोषण)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading