दिनांक १४ मे २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यासाठी कुकडी आवर्तन तत्काळ सुरू करावे व फळबागांना प्राधान्याने पाणी द्यावे या मागणीसाठी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी मंगळवार, १३ मे पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला शेवटी जलसंपदा विभागाकडून लेखी आश्वासन मिळाले असून येत्या १६ मे रोजी कुकडीचे आवर्तन सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे राजेंद्र म्हस्के यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.

उपोषणस्थळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांनी भेट देऊन म्हस्के यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, “श्रीगोंदा तालुक्यातील मागणीचा विचार करून २० मे रोजी सुरू होणारे आवर्तन आता १६ मे रोजी सुरू करण्यात येत आहे. यासंदर्भात दोन दिवसांत पाणी रोटेशन व नियोजनाबाबत अधिकृत माहिती जाहीर केली जाईल. तसेच श्रीगोंद्याला पाणी प्राधान्याने देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.” हे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर राजेंद्र म्हस्के म्हणाले की, “आमच्या प्रमुख मागण्यांपैकी एक पूर्ण झाली आहे, त्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करीत आहोत. मात्र रोटेशन कालावधी व पाण्याचे व्यवस्थापन याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. दोन दिवसांत या विषयावर निर्णय होईल असे सांगण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपोषण थांबवत असून, पुढील निर्णय पाणी नियोजनानंतर घेतला जाईल. जर लाभधारक शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर पुन्हा आंदोलन छेडू.”

या आंदोलनाला परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा आणि मान्यवरांचा पाठिंबा लाभला. उपोषणस्थळी बाबासाहेब भोस, हरिदास शिर्के, अनिल ठवाळ, प्रमोद राजेंद्र म्हस्के, एकनाथ आळेकर, गंगाराम दरेकर, अरुण जगताप, दत्तात्रय हिरणावळे, सुनील भोस, विश्वास थोरात, भाऊसाहेब मांडे यांसह अनेकांनी भेट देऊन समर्थन व्यक्त केले.

“आधी श्रीगोंद्याला पाणी द्या… अन्यथा कुकडी कॅनॉलमध्ये उतरणार!” – राजेंद्र म्हस्के
“कर्जत तालुक्याआधी श्रीगोंदा तालुक्याला पाणी देण्यात यावे, ही माझी प्रमुख मागणी आहे. मागील वेळेस आमच्यावर अन्याय झाला होता. यावेळी तो अन्याय सहन करणार नाही. लाभधारक शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट कॅनॉलमध्ये उतरू. आम्ही शांततेने आंदोलन केले, मात्र वेळ आली तर तीव्र आंदोलन करण्यासही मागेपुढे पाहणार नाही,” असा इशारा राजेंद्र म्हस्के यांनी दिला आहे.
स्रोत:(आंदोलन)


Advertise…
