#श्रीगोंदा.. अपघातांचे ब्लॅकस्पॉट ठरत असलेले आढळगाव रस्त्याचे काम रखडले; खासदार लंके आक्रमक, 548 D च्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची चर्चा..!

दिनांक १५ मे २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 D वरील अपूर्ण रस्त्यामुळे अनेक ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे. रस्त्यावर पडलेला मुरूम, उखडलेला मार्ग आणि अर्धवट काम यामुळे मागील काही वर्षांत अंदाजे २५ ते ३० जणांनी आपले प्राण गमावले आहेत. विशेषतः डी. वाय. १२ आणि छत्तीसे वस्ती ही ठिकाणे अपघातांसाठी कुप्रसिद्ध ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखली जात आहेत.

स्थानिक ग्रामस्थांनी ८०० मीटर अंतराच्या अपूर्ण रस्त्याच्या कामासाठी वारंवार मागणी केली, परंतु जबाबदारी सोपविण्यात आलेली निखिल कन्स्ट्रक्शन कंपनी वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये संतप्त ग्रामस्थांनी रस्तारोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला होता.

नुकत्याच झालेल्या अपघातात चुलता आणि पुतण्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या प्रश्नाला अधिक तीव्रतेने उचलण्यात आले. आज जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांनी या ठिकाणी भेट देत निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीचे पदाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

या दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात खासदार लंके यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या डिप्युटी इंजिनिअरला लाथ मारून शिवीगाळ केली, असा काही प्रत्यक्षदर्शींनी दावा केला आहे. मात्र पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी दिलेली नाही.

घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये जमले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम, निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीचे पदाधिकारी व महामार्ग विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत खासदार लंके यांनी पोलिस स्टेशनमध्ये बैठे आंदोलनाचे नेतृत्व केले. तसेच संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना जबाबदार धरून प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत असा इशारा दिला.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading