RPI (A) तालुकाध्यक्ष प्रदीप जगताप यांना जीवे मारण्याची अप्रत्यक्ष धमकी; दुचाकीच्या सीटवर लिहिले ‘तु ३० मे ला मरणार आहे’..

दिनांक १४ मे २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील झेंडा चौक परिसरात राहणारे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते असलेले प्रदीप प्रभाकर जगताप (वय ३५ वर्ष) यांना अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची अप्रत्यक्ष धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिनांक १२ मे २०२५ रोजी संध्याकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास, श्रीगोंदा शहरातील खाटीक गल्ली येथे ही घटना घडली. फिर्यादी जगताप हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या ताब्यातील बुलेट (क्रमांक MH12 PM 4017) या दुचाकीच्या सीटवर ‘तु ३० मे ला मरणार आहे’ असा मजकूर लिहिलेला आढळून आला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

विशेष बाब म्हणजे, याआधीही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर ‘मर्डर’‘302’ असे लिहून अप्रत्यक्ष धमकी दिली होती. ही दुसरी वेळ असल्याने या धमकीला जगताप आणि त्यांच्या समर्थकांनी अधिक गांभीर्याने घेतले आहे.

फिर्यादी प्रदीप जगताप यांनी यासंदर्भात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, संभाव्य संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

या प्रकारामुळे श्रीगोंदा शहरात खळबळ उडाली असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना अशा पद्धतीने धमकावणे गंभीर असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

— स्रोत:(फिर्याद)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading