श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणी फराटे यांच्या तातडीने बदलीची मागणी – माजी सदस्य राजेंद्र म्हस्के यांचे आमरण उपोषण..

श्रीगोंदा प्रतिनिधी | दि. २ ऑगस्ट २०२५:

श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणी फराटे यांच्या कारभारातील भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि मनमानी कारभाराच्या निषेधार्थ पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी जिल्हा परिषद कार्यालय, अहिल्यानगर येथे लक्षणीय आमरण उपोषण सुरू केले. गटविकास अधिकारी यांची तातडीने बदली करण्याची मागणी त्यांनी केली.

म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी आणि गाय-गोठा बांधकाम प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार करून बोगस बीले अदा केली.

त्यामुळे अनेक गरजू लाभार्थी वंचित राहिले आहेत. महिला बचत गटांमध्ये देखील मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी आरोप केले. ग्रामसेवकांना अपमानास्पद वागणूक देणे, त्यांच्यावर दबाव आणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणे, ठेकेदारांना अडवणूक करणे, मुख्यालयी वास्तव्य न ठेवता शासकीय वाहनांचा गैरवापर करणे असे गंभीर आरोप गटविकास अधिकारी राणी फराटे यांच्यावर करण्यात आले आहेत.

ग्रामसेवक व कनिष्ठ सहाय्यकांनी अन्यायास कंटाळून राजीनामे दिल्याचा उल्लेख करत म्हस्के म्हणाले की, पंचायत समिती स्तरावरील १५ वा वित्त आयोगामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

उपोषणाची दखल – चौकशीचा दिला शब्द

उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी उपोषणस्थळी भेट दिली. रोजगार हमी आणि १५ वा वित्त आयोग गैरव्यवहार प्रकरणातील चौकशी अंतिम टप्प्यात असून २९ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम सुनावणी होणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच इतर प्रकरणांवरही चौकशी करून पुढील कारवाई होईल, असे त्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या हस्ते राजेंद्र म्हस्के यांनी उपोषण सोडले.

या आंदोलनात माजी सदस्य अनिल ठवाळ, माऊली मोटे, प्रमोद म्हस्के, संभाजी घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

🗨️ “अन्यथा आयुक्तांकडे दाद मागणार” – राजेंद्र म्हस्के..
गटविकास अधिकारी यांच्या गैरकारभाराचा व भ्रष्टाचाराचा सविस्तर अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिला असून, तातडीने कारवाई झाली नाही तर पुढील आंदोलन आयुक्त कार्यालयासमोर करण्याचा इशारा म्हस्के यांनी दिला.

🗨️ “कारवाई अंतिम टप्प्यात” – राहुल शेळके
उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळके म्हणाले की, रोजगार हमी आणि १५ वा वित्त आयोग प्रकरणातील चौकशी पूर्णत्वाकडे असून २९ ऑगस्टला सुनावणी होऊन अंतिम निर्णय जाहीर होईल.

स्रोत:(आमरण उपोषण)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading