दिनांक ५ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील मांडवगण रस्त्यालगत दोन दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडवली आहे. किरकोळ आर्थिक व्यवहाराशी संबंधित सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट आणि राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या प्रकरणावर श्रीगोंदा पोलिसांनी अद्याप कोणताही ठोस खुलासा केला नाही.

प्राप्त माहितीनुसार, अनेक वर्षांपासून चालक असलेल्या त्या व्यक्तीने सोशल मीडियावर त्याचे आर्थिक व्यवहारा संबंधित एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टला राजकीय विरोधक असलेल्या एका व्यक्तीने प्रतिक्रिया दिल्यामुळे या घटनेबाबत वातावरण तापले. फोनवर झालेल्या चकमकीत वाद अधिक चिघळला आणि रागाच्या भरात संबंधित चालकाच्या मालकाने मांडवगण रस्त्यावरील आपल्या व्यवसाय स्थळाजवळ हवेत तीन राऊंड गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींनी ही घटना घडल्याचे सांगितले असून, या प्रकाराने स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत.

घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला असता, “तपास सुरू आहे,” असे सांगून त्यांनी कोणताही खुलासा करण्याचे टाळले. यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि संभ्रम वाढला आहे. “घटना घडली असल्यास पोलिसांनी तत्काळ कारवाई का केली नाही.? जर हा प्रकार खोटा असेल, तर अफवा थांबवण्यासाठी पावले का उचलली नाहीत.?” असे सवाल उपस्थित होत आहेत.

स्रोत:(मिळालेली माहितीनूसार)

