दिनांक ५ डिसेंबर २०२४,श्रीगोंदा:
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले घरकुल रद्द केल्याच्या विरोधात सुरेगाव येथील भूमिहीन शेतमजूर श्री. कचरू गंगाराम लष्करे यांनी पंचायत समिती, श्रीगोंदा कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यासंबंधी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे लिखित अर्ज सादर केला आहे.

श्री. कचरू लष्करे हे बहुजन समाज पार्टीचे कोषाध्यक्ष असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. “माझ्या नावावर महाराष्ट्रात किंवा भारतात कोठेही पक्के घर नाही. मी भूमिहीन असून कुटुंबातील कोणीही शासकीय किंवा निमशासकीय नोकरी करत नाही. तसेच, कोणत्याही प्रकारचा आयकर आम्ही भरत नाही. पक्क्या घराची नितांत आवश्यकता असून माझे घरकुल मंजुरीचे रद्द होणे हा अन्यायकारक निर्णय आहे,” असे लष्करे यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळणे हा गरजू आणि भूमिहीन कुटुंबांसाठी मोठा दिलासा आहे. परंतु, श्री. लष्करे यांच्या म्हणण्यानुसार, “मी यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही. मंजूर झालेल्या घरकुलाचे रद्द होणे हे अन्यायकारक असून मला पुन्हा मंजूरी देण्यात यावी,” अशी विनंती त्यांनी केली आहे.

श्री. लष्करे यांनी आपल्या अर्जात पुढे नमूद केले की, “माझ्या विनंतीला प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही, तर मी २३ डिसेंबर २०२४ रोजी श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे.”

श्रीगोंदा तालुक्यातील भूमिहीन कुटुंबांना पक्क्या घराचा आधार मिळावा, यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने सदर प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळवून दिल्यास भूमिहीन नागरिकांच्या समस्या सुटतील, असे मत बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनिल ओहोळ यांनी व्यक्त केले आहे.
स्रोत:(कचरु लष्करे, श्रीगोंदा यांचे निवेदन)
