दिनांक २९ एप्रिल २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहराचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांची शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे राज्य नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आली. यावेळी श्री. पोटे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावर्षी जानेवारी महिन्यात मनोहर पोटे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.

पोटे यांनी २०१६ ते २०१८ या काळात नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द बजावली असून त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती.

त्यानंतर नागरिकांनी पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावर विश्वास दाखवत त्यांच्या पत्नी सौ. शुभांगी ताई पोटे यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले. त्यांचा कार्यकाळ २०२४ मध्ये पूर्ण झाला, मात्र पुढील निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षाची निष्ठा आणि जनतेत कार्यकर्तृत्वाने ओळख निर्माण केलेल्या मनोहर पोटे यांना आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे श्रीगोंदा तालुक्यात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

नियुक्तीप्रसंगी बोलताना मनोहर पोटे म्हणाले, “पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा विचार तळागाळात पोहोचवून पक्षाला अधिक बळकट करणार आहे.”

या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, श्रीगोंदा तालुका प्रमुख नंदकुमार ताडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनोहर पोटे यांच्या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

