#श्रीगोंदा.. खोट्या लग्नाच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणारी टोळी उघडकीस; बनावट नवरी व मावस भाऊ श्रीगोंदा पोलिसांच्या जाळ्यात..!

दिनांक १५ जुलै २०२५,श्रीगोंदा:

राज्यातील तसेच परराज्यातील अविवाहित तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश श्रीगोंदा पोलिसांनी केला आहे. खोटा विवाह रचून पैसे घेणारी बनावट नवरी आणि तिचा बनावट मावस भाऊ अशी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे अनेक तरुणांची संभाव्य फसवणूक टळली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील रोहित रमेश तरटे (वय २८) या हॉटेल व्यवसायिक तरुणाची या टोळीने फसवणूक केली होती. १३ डिसेंबर २०२४ रोजी घोगरगाव व १४ डिसेंबर रोजी आळंदी (पुणे) येथील रिद्धी-सिद्धी मंगल कार्यालयात लग्नाचे नाटक रचून त्याच्याकडून तीन लाख रुपये घेण्यात आले. त्यानंतर बनावट नवरीने काही दिवस त्याच्या घरी वास्तव्यास राहत घरातील रोख रक्कम चोरली आणि पसार झाली.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३१८(४), ३०३(२), ३(५) अंतर्गत ११ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने बुलढाणा, जालना व संभाजीनगर परिसरात शोध मोहीम राबवली. यावेळी १) नवरीचा बनावट रोल करणारी एक महिला आणि २) मावस भावाचा रोल करणारा आकाश तोताराम सुरोशे (वय ३१, रा. दहिद बु. ता. जि. बुलढाणा) या दोघांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या आरोपींना १३ जुलै रोजी श्रीगोंदा कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी आणखी कोठे खोटे विवाह केले असतील किंवा अन्य कोणी फसवणूक झाल्यास त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपींविरोधात राजस्थानमधील धम्बोला पोलीस ठाण्यात देखील भा.दं.वि.कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल आहे, अशी माहिती समोर आली आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय अधिकारी गणेश उगले, तसेच श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्हे शोध पथकातील पो.ना. संग्राम जाधव, पोकॉ. संदीप शिरसाठ, पोकॉ. रवि जाधव, पोकॉ. संदीप राऊत, पोकॉ. अरुण पवार, पोकॉ. संदीप आजबे, पोकॉ. मयुर तोरडमल, मपोकॉ. अलका वाघ, तसेच सायबर सेलचे पो.कॉ. राहुल गुंडु व पो.कॉ. नितीन शिंदे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पो.हे.कॉ. भांडवलकर व पो.कॉ. फारुख मण्यार करत आहेत.

खोट्या लग्नाच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या इतर पीडितांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनशी त्वरित संपर्क साधावा.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading