मंदिर चोरांच्या टोळीचा पर्दाफाश; ४ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त..

दिनांक १२ ऑक्टोबर २०२५,अहिल्यानगर:

जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने टोळीकडून मंदिर चोरीचे १५ गुन्हे उघडकीस आणले असून, त्यांच्याकडून एकूण ४ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये, अंमलदार सुरेश माळी, गणेश लोंढे, विष्णू भागवत, फुरकान शेख, राहुल डोके, आकाश काळे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल, प्रशांत राठोड, महादेव भांड, सोनल भागवत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

पाथर्डी तालुक्यातील करोडी येथील शनिमारुती मंदिरातील दानपेटी फोडून ३ लाख ५० हजार रुपये चोरून नेल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्याचा तपास करत असताना, पथकाला सदरचा गुन्हा आरोपी राहुल भालेराव व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल किशोर भालेराव (रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर), रामेश्वर ज्ञानदेव धनेश्वर (रा. इंदिरानगर, भोकर, ता. श्रीरामपूर), एकनाथ नारायण माळी (रा. ममदापूर, ता. राहाता, हल्ली रा. बिरोबा बन, शिर्डी) आणि शत्रुघ्न मुरलीधर मोरे (रा. टाकळीमानूर, ता. पाथर्डी) या चार आरोपींना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींनी त्यांचे साथीदार राहुल भाऊसाहेब माळी (रा. बिरोबा बन, शिर्डी) (पसार), पांडू ऊर्फ दत्तू बाबासाहेब मोरे (रा. भोकर, ता. श्रीरामपूर) (पसार), आणि दत्तू मोरे याचा एक अनोळखी मित्र यांच्यासह मागील ७ ते ८ महिन्यांमध्ये ‘अ हिल्यानगर’ जिल्ह्यातील मंदिरांमध्ये घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली.

गुन्हे शाखेने आरोपींकडून रोख रक्कम, दागिने, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ४ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मंदिर चोऱ्यांचे १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. टोळीतील पसार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading