दिनांक १२ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:
तालुक्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना भिंगाण दुमाला शिवारात घडली आहे. एका क्रूर पतीने आपल्या पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याच आठ वर्षांच्या धाडसी मुलीमुळे तिच्या आईचा जीव वाचला आहे. आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील शेख हा आपल्या सासरवाडीत मुक्कामी होता. आज सकाळी तो आपली पत्नी आणि आठ वर्षांची मुलगी हिला घेऊन घोडेगावला निघाला होता.

मात्र, त्याच्या मनात पत्नीला मारण्याचा कट होता. त्याने घोडेगावकडे न जाता, तेरा नंबर चारीमार्गे भिंगाण दुमाला शिवारात गावापासून अर्धा किलोमीटर पूर्वेला तुरीच्या शेतात गाडी नेली. या ठिकाणी त्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. तो तिला मारहाण करत असताना, बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आपल्या आईला पाहून त्यांची चिमुरडी मुलगी न घाबरता त्वरित तिथून गावाकडे धावत निघाली.

गावात पोहोचल्यावर, त्या मुलीने हात जोडून, टाहो फोडत गावकऱ्यांची मदत मागितली. ती गावकऱ्यांना सांगत होती, “माझ्या आईला माझ्या वडिलांनी मारून टाकले आहे. तुम्ही चला, मदत करा!” त्या निष्पाप मुलीच्या आक्रोशाने गावातील लोक हादरले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.

गावकरी येत असल्याचे पाहून आरोपीने धूम ठोकली. ‘आता ही मयत झाली आहे’, असे समजून तो पळून गेला.
गावातील मंडळी, तसेच गावचे सरपंच तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी अवस्थेतील महिलेला त्वरित मदतीसाठी उचलले. प्रशासकीय यंत्रणा (पोलीस, ॲम्बुलन्स) उशिराने पोहोचल्याने गावकऱ्यांनी मानवता दाखवत पीडित महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, नंतर अधिक उपचारासाठी तिला दौंड येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

कारवाई झाली असती, तर…
जखमी महिलेच्या वडिलांनी (मुलीच्या आजोबांनी) अत्यंत संवेदनेने सांगितले की, त्यांनी यापूर्वीही जावया विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्याच वेळी जर पोलिसांनी त्याचे वर योग्य कारवाई केली असती, तर आज ही गंभीर घटना घडलीच नसती, असे त्यांचे म्हणणे आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आठ वर्षांच्या मुलीच्या समयसूचकतेमुळे तिच्या आईचे प्राण वाचले, याबद्दल तिच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रीगोंदा पोलीस पुढील तपास करत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहिती)
