गोव्याच्या बेकायदेशीर दारूचे श्रीगोंदा कनेक्शन: बीडमधील छाप्यात राज्य उत्पादन शुल्क विभागावर प्राणघातक हल्ला, ५ जणांना अटक!

दिनांक ६ जून २०२६, श्रीगोंदा/बीड/कडा:

आष्टी तालुक्यातील कापसी फाटा येथील ‘हॉटेल राजमुद्रा’वर बेकायदेशीर दारूविक्रीप्रकरणी छापा मारण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हॉटेल मालकासह ७ ते ८ जणांच्या जमावाने लाठ्या-काठ्या आणि दगडांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात शासकीय कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून जप्त केलेला मुद्देमालही हिसकावून घेण्यात आला. या प्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

३ जून २०२६ रोजी अहिल्यानगरी येथील निरीक्षक सुरज कुसळे यांनी आष्टी कार्यालयाला गोपनीय माहिती दिली होती की, श्रीगोंदा तालुक्यात केलेल्या एका मोठ्या कारवाईत गोव्यातील प्रतिबंधित दारूचा साठा मिळाला असून, त्याचे मुख्य धागेदोरे कापसी फाटा येथील ‘हॉटेल राजमुद्रा’चा मालक सुनील गोल्हार याच्याशी थेट जोडलेले आहेत. या आधारावर पथकाने रात्री छापा टाकला.

छाप्यादरम्यान मॅकडॉवल व्हिस्की आणि देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. हॉटेल मालक सुनील बाबासाहेब गोल्हार (वय ३३) याला ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल तपासला असता, त्यात गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांवर ‘महाराष्ट्र बनावटी’चे बनावट सरकारी लेबल लावतानाचे व्हिडिओ आणि फोटो सापडले.

हा पुरावा तपासत असताना ७ ते ८ लोकांचा जमाव हॉटेलमध्ये घुसला. त्यांनी “तुम्यांच्याकडे जप्ती वॉरंट आहे का?” असे म्हणत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व लाठ्या-काठ्या, दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. जमावातील व्यक्तींनी जप्त केलेला दारूचा साठा पोलिसांच्या हातातून बळजबरीने हिसकावून घेतला आणि पळ काढला. पथकातील महिला अधिकारी संगीता जाधव यांनी तातडीने अंमळनेर पोलिसांशी संपर्क साधून अतिरिक्त मदत मागवली.

अंमळनेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुनील बाबासाहेब गोल्हार (वय ३३),भरत आश्रुबा गोल्हार (वय २९),सूर्यकांत रामनाथ विटकर (वय ३१), लहु सुखदेव गर्जे (वय ५९), सुरेश शामराव गोल्हार (वय ४७) यांना ताब्यात घेतले.

तर पोलिसांवर हल्ला करून मुद्देमाल घेऊन पळालेले संशयित आश्रुबा नामदेव गोल्हार आणि अभिमान देवदास गोल्हार (सर्व रा. कापसी, ता. आष्टी) यांच्यासह इतर अज्ञात आरोपींवर शासकीय कामात अडथळा आणणे, प्राणघातक हल्ला करणे, दंगल घडवणे आणि दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणाची अधिकृत फिर्याद आष्टीचे निरीक्षक दादासाहेब गुजाबापू देवकाते यांनी दिली आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading