श्रीगोंदा/आंबेगाव..पारगाव, [२३ जून, २०२५]:
आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावाच्या हद्दीत रांजणगाव ओझर अष्टविनायक महामार्गावर रविवार, २२ जून २०२५ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात शिवराज सुनील रोडे (वय ६, रा. रोडेवाडी, पोंदेवाडी) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या एका इको गाडीने त्याला धडक दिली.
पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आणि सुनील बाळू रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास पोंदेवाडी गावाच्या हद्दीत, रांजणगाव ओझर अष्टविनायक महामार्गावरील रोडेवाडी फाट्याजवळ हा अपघात घडला.

शिरूर बाजूकडून पारगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम. एच. १२ डब्लू. के. ६८९४ या इको गाडीने रस्त्या ओलांडणाऱ्या शिवराजला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली.

या धडकेत गंभीर जखमी झालेल्या शिवराज सुनील रोडे याला तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
पारगाव कारखाना पोलिसांनी इको चालक विक्रम मधुकर शिशुपाल (रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके पुढील तपास करत आहेत.

या अपघातानंतर रोडेवाडी येथील नागरिकांनी रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. अपघात घडलेल्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात घरे आहेत आणि वाहनांचा वेग जास्त असल्याने यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत.

त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी निलेश पडवळ, शुभम चांगण आणि लहू रोडे यांनी आज माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन केली. श्री. वळसे पाटील यांनी संबंधित विभागाला सूचना केली असल्याचे निलेश रोडे यांनी सांगितले.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
