याबद्दल मला विचारलं. खाली मान घालून मी त्यांना माझ्याकडे त्यापैकी काहीच नसल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी हेडमास्तरांनी मला आपल्या ऑफिसमधे बोलावलं व स्वेटर, टोपी व चप्पल असलेलं एक मोठं पाकीट माझ्या हातात दिलं. मला काय बोलावं, तेच सुचेना. मी तसाच घरी पळत आलो व ते पाकीट आईला दाखवलं.

दुसऱ्या दिवशी आईने शाळेत येऊन आमच्या हेडमास्तरांचे हात जोडून आभार मानले. अश्रू दाटलेल्या नजरेने त्यांच्याकडे बघत तिने मला त्यांच्या पाया पडायला सांगितलं. हेडमास्तर गहिवरून आईला म्हणाले, “बाई, तुमना पोटले सोन्यासारखा पोऱ्या जन्माले येल शे. कायबी व्हयनं तरी पोऱ्याले शिकाडा . त्येना शिक्षण मा कायीच अडथडा येऊ नका द्या. ‘त्यांचं बोलणं ऐकून आईलाही गलबलून आलं. तिनेही हेडमास्तरांचे पुन: पुन्हा आभार मानत मला शिकवायचं वचन दिलं. त्यांच्यासारख्या अनेक शिक्षकांनी मला खूप प्रेम दिलं. गरज पडली तेव्हा सर्व प्रकारची मदतही केली. विद्यार्थ्यांप्रती अशी कळकळ मला केवळ जिल्हा परिषद शाळांमधूनच दिसते. (I had a dream! Dr. Rajendra Bharud .. (IAS). Part 17.)
त्या दिवशी पूर्ण शाळेत माझीच चर्चा होती. आदर्श शिक्षकांच्याच विश्वासावर माझ्यासारखे दारिद्यात खितपत पडेलेले विद्यार्थी उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहू शकतात. त्या शाळेत मला शिक्षण तर मिळालंच, सोबत चांगले संस्कार व माणुसकीचे धडेही मिळाले. हे धडे तेथील शिक्षकांनी पुस्तकातून नाही, तर रोजच्या जगण्यातून दिले. आज असे शिक्षक अभावानेच दिसतात. सर्व ताळतंत्र सोडून धावणारा काळाचा वेगही याला तेवढाच जबाबदार असावा. मी मात्र त्याबाबतीत नशीबवान ठरलो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला योग्य वेळी योग्य आधार व मार्गदर्शन मिळालं.”
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
