मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड (IAS)..भाग २१.

मनाबी पोऱ्या एक दिन डाक्टर – कलेक्टर व्हई

भिलाटीत आम्हाला लहानपणी खेळणी वगैर मिळत नसत. आमचा मुख्य विरंगुळा म्हणजे आमचे सवंगडीच होते. आम्ही सर्व मिळून निरनिराळे खेळ खेळत असू. त्यातही प्रामुख्यानं कबड्डी, लपंडाव, चिल्लीपाटी, गोट्या इत्यादींचा समावेश असे. आमच्या खेळासाठी आम्हाला कुठलीही साधने विकत घ्यायची गरज पडत नसे. तेवढी आमच्यापैकी कोणाची ऐपतही नव्हती. आम्हीच मग कधी चिकणमातीपासून गाय, बैल, बैलगाडी इत्यादी खेळणी तयार करून त्यांच्याशीच खेळत असू. आम्हा भिल्लांच्या पोरांचा उकिरड्यावर कायम वावर असे. तिथं आम्हाला रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, नारळाची करवंटी, दंतमंजनच्या बाटल्या अशा वस्तू सापडत असत. हे सर्व गोळा करून आम्ही मुलं घर – घर खेळायचो.

https://bit.ly/bspmycityshrigonda

अशा खेळांचा कंटाळा आला, की मग आम्ही सर्व नदीवर जाऊन मस्तपैकी पोहत असू. नदीकाठावर वाळूमध्ये कुस्ती खेळणं आम्हाला खूप आवडायचं. आमच्या भिलाटीमधील मोठ्या पोरांनी गावातील सुताराकडून एक बॅट बनवून घेतली होती. कधी – कधी मग आम्ही लहान मुलंही त्यांच्यासोबत नदीकाठावर क्रिकेट खेळायला जायचो. इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपातील गेम्स अस्तित्वात आहेत, याचा तर आम्हाला गंधही नव्हता. साधं प्लास्टिकचं खेळणही आमच्या हातात कधी पडत नसे. शिवाय आमच्याकडे मनोरंजनाचे एवढे पर्याय उपलब्ध होते, की आम्हाला या सर्व गोष्टींची ना कधी गरज पडली ना उणीव भासली. निसर्गाच्या सान्निध्यात खेळताना वेळ झपाट्याने निघून जायचा. उन्हाळ्यात आंब्याच्या कोर्सचा खेळ आम्हाला विशेष प्रिय होता. गल्लीबोळात फिरून, उकिरडे धुंडाळून आम्ही आंब्याच्या कोयी गोळा करून आणायचो व एक रिंगण करून दिवसभर खेळत बसायचो.

एका वर्षी तर मी चांगले तीन – चार टोपल्या भरून कोयी जिंकल्या होत्या. त्या सर्व कोयी मी छान गोळा करून ठेवत असे. नंतर स्वयंपाकाच्या चुलीत किंवा दारूच्या भट्टीत त्यांचा सरपणासारखा उपयोग व्हायचा. आमचे सर्व खेळ असेच होते. आम्हाला इतर खेळण्यांचं आकर्षण नव्हतं, असं नाही. पण ती खेळणी आपल्याला मिळूच शकत नाही, हे माहीत असल्यामुळे त्यासाठी हट्ट धरण्याचा प्रश्नच येत नसे. (I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS) .. Part 21.)

एकदा मात्र मला आठवतं, की गावाच्या जत्रेत आईने मला एक छोटीशी प्लास्टिकची गाडी विकत घेऊन दिली होती. मी दिवसभर ती कशी चालवायची, ते मित्रांना दाखवत होतो. ते सुद्धा जादूचा खेळ पाहावा एवढ्या तन्मयतेने त्या खेळण्याकडे पाहत होते. एखाद्या कंजूष व्यापाऱ्याने आपलं धन जपावं, तसं कितीतरी दिवस मी त्या गाडीला जिवापाड जपलं. चौथीत असताना मी स्कॉलरशिपची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झालो. त्यावेळी मला पन्नास रुपयांची स्कॉलरशिप मिळाली होती. ते सर्व पैसे मी आईकडे नेऊन दिले. काही दिवसांनी आई मला गावातीलच जत्रेत घेऊन गेली तेव्हा तिने माझ्या हातात पाच रूपये ठेवत मला हवं ते घेण्यास सांगितलं. त्या दिवशी तर मला जगातील सर्वात श्रीमंत माणूस असल्यासारखंच वाटत होतं.

मी आईला सोडून तसाच पळत सुटलो. एक म्हातारा खेळणे विकताना दिसला. त्याच्याकडे माकडाचं एक खूप सुंदर खेळणं होतं. एका लोखंडी तारेच्या वरच्या टोकाला एक प्लास्टिकचं माकड बसवलं होतं. लोखंडी तारेचं वरचं टोक खाली केलं, की ते माकड सरसरत आपोआप वर जाई. तार पुन्हा खाली ओढली, की माकड पुन्हा आपोआप वर जाई. मी मंत्रमुग्ध होऊन त्या खेळण्याकडे पाहत होतो. शेवटी हिम्मत गोळा करून त्या म्हाताऱ्याला माकडाच्या खेळण्याची किंमत विचारली. त्याने त्याची किंमत पाच रुपये सांगितली. मी लगेच खिशातील पाच रुपये काढून त्याच्या हातात ठेवले व ते खेळणे घेऊन धावत सुटलो. ते खेळणं जेव्हा मी आईला दाखवलं, तेव्हा ती माझ्यावर रागावलीच. तिला वाटलं होतं, की मी खाऊ वगैरे काहीतरी घेईन. त्यावेळी आमच्यासाठी पाच रुपयांचंही खूप मोल होतं. पैसे असे खेळण्यात वाया गेले, याचं आईला वाईट वाटलं; पण आता पैसे परत येणार नव्हते, त्यामुळे आई गप्प बसली.

घरी येताना मी रस्त्याने त्या माकडाला वारंवार उलटासुलटा करत त्याच्याशी खेळत होतो. घरी आल्यानंतरही माझे माकडचाळे सुरुच होते. मी ते खेळणं मित्रांना दाखवत फिरत होतो. पण मी कोणालाही त्या खेळण्याला हात लावू दिला नाही. माझ्या सर्व मित्रांमध्ये असं खेळणं फक्त माझ्याकडेच असल्यामुळे त्या दिवशी मला राहून – राहून मी इतरांपेक्षा खूप वेगळा आहे, असं वाटत होतं. त्या रात्री ते खेळणं उशाशी घेऊनच मी झोपी गेलो. त्याक्षणी ते खेळणंच माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा खजिना होता. दुसऱ्या दिवशी शाळेत जातानाही मी ते खेळणं सोबतच घेतलं. रस्त्याने त्याच्याशी खेळतच शाळेत गेलो. शाळेतली मुलं मोठ्या नवलाईने माझ्या त्या खेळण्याकडे बघत होती. त्यांच्या नजरेतले ते भाव पाहून मला मनातल्या मनात खूप आनंद होत होता. पण मी ते खेळणं कुणालाही दिलं नाही. अगदी माझ्या जवळच्या मित्रांनासुद्धा मी ते दुरूनच दाखवलं.

थोड्या वेळाने वर्गशिक्षिका वर्गात आल्या. तेव्हा मात्र मला खेळणं दप्तरात ठेवावं लागलं. योगायोगाने त्या दिवशी बाईंनी आम्हाला शिबीराजाची गोष्ट सांगितली. ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. बाईंकडून गोष्ट ऐकायला खूप मजा यायची. गोष्ट सांगताना हातवारे करून त्या सांगत असत. जणू गोष्टीतील प्रसंग त्यांच्यासमोरच घडत आहेत, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर असत. आवाजदेखील प्रसंगानुरूप लहान – मोठा होत असे. त्यादिवशी बाई सांगत होत्या “एकदा काय झालं, शिबीराजा आपल्या राज्यातील जंगलात विहार करत असताना त्याला दोन पक्षी दिसले. एक होता बहिरी ससाणा आणि एक होता पारवा. ससाण्याने पारव्याला तीक्ष्ण नख असलेल्या आपल्या पंजात घट्ट पकडलं होतं. ससाण्याने मोठ्या प्रयत्नाने ती शिकार मिळविली असावी. त्याला खूप जोराची भूक लागली होती. अचानक राजाला तिथे बघून पारव्याच्या जीवात जीव आला. त्याने राजाला हाक मारली, ‘महाराज मला वाचवा!’. शिबीराजा फार दयाळू होता. त्याला त्या पारव्याची दया आली व तो ससाण्याला म्हणाला, की तू या गरीब पारव्याला जीवदान दे. पण ससाण्याने राजाला म्हटले, की जर मी या पारव्याला सोडले, तर भुकेने माझाच जीव जाईल. राजा विचारात पडला. ससाण्याला सांगितले, की जर तू या पारव्याला सोडलं, तर मी तुला तू मागशील ते देईन. यावर ससाणा बोलला, की त्याला सोने – चांदी काहीही नको. त्याला त्याने…

क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)

Leave a Reply