मु .पो. नवोदय विद्यालय, राजस्थान
मध्यप्रदेशाच्या सीमेत आल्यानंतर काही वेळाने विंध्याचल भागातून आमचा प्रवास चालला होता. तो उंचच उंच विंध्य पर्वत, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली दाट वनराई, पृथ्वीचा तळ गाठणाऱ्या खोल दऱ्या. मला तर काय बघू आणि काय नाही, असे झाले होते. त्यातल्या त्यात शेकडो लहान – मोठ्या धबधब्यांनी आमच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

दुपारी दोनच्या सुमारास आम्ही इंदूरला पोहचलो. तिथून पाच वाजता आम्हाला पुढचा प्रवास सुरू करायचा होता. प्रवासाचा दुसरा टप्पा म्हणजे इंदूर ते झालवाड. संध्याकाळी पाच ते पहाटे पाच असा बारा तासाचा हा प्रवास होता. आम्ही सर्व मुलं कदाचित पहिल्यांदाच राज्याबाहेरील प्रवास करत होतो. त्यामुळे प्रवासाचा पहिला टप्पा अगदी मजेत गेला. मात्र, दुसऱ्या टप्प्याने आमच्या नाकीनऊ आणले. यावेळी आम्हाला एक अगदीच खिळखिळी झालेली बस मिळाली. मी ड्रायव्हरकडे पाहिलं, तर तो तारेवर तार घासून गाडी सुरू करत होता. भीतीने मी एक आवंढा गिळला. बऱ्याच प्रयत्नानंतर ड्रायव्हरने गाडी सुरू केली व त्या दगड – मातीच्या कच्च्या रस्त्यावरून आमचा प्रवास सुरू झाला. रस्ता एवढा अरुंद होता. की, समोरून एखादं वाहन आल्यास आमचा ड्रायव्हर चाळीस पन्नास फूट मागे गाडी घेत असे.

कसेबसे आम्ही रात्री बाराच्या सुमारास जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचलो. तिथून आम्हाला अटरू’ या विचित्र नावाच्या गावाकडे जायचे होते. प्रवासात राजस्थान विषयी आम्हाला खूप काही जाणून घेता आले. राजस्थान हे गरीब – कष्टकरी लोकांचे राज्य आहे. आणि शहरी भाग वगळल्यास इथे सोयी – सुविधांचा खूपच अभाव आहे. एकमेकांना लागूनच असलेल्या राज्यांमधील ही तफावत आम्हा लहान मुलांनाही विचार करायला लावणारी होती. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे राजस्थानात पाण्याची प्रचंड टंचाई. इथे जेमतेम आंघोळीसाठी पाणी मिळत असे. त्यामुळे बाकी सर्व कार्यक्रम बाहेर उघड्यावरच करावे लागत असे. एकदाचे आम्ही आमच्या नव्या अटरू नवोदय विद्यालयात पोहोचलो. आता संपूर्ण वर्षभर आम्हाला याच ठिकाणी राहायचं होतं.
अटरू नवोदय विद्यालयात आम्हाला अनेक गोष्टी प्रथमच बघता आल्या, अनुभवता आल्या. त्या मी कधीही विसरू शकत नाही. आमच्यासोबत आलेले सूर्यवंशी सर परत जायला निघाले तेव्हा त्यांना जाताना पाहून माझ्या काही मित्रांना रडू आवरले नाही. त्यांनी आमची समजूत घातली. आम्हाला आपल्या ‘नवोदय’चं नाव मोठं करायला सांगून ते माघारी निघाले. मग आम्ही मुलंच एकमेकांचं सांत्वन करू लागलो. काही वेळाने तिथल्या ‘नवोदय’चे कोळी सर व सुप्रिया मॅडम यांच्याशी आमची भेट झाली. अटरू ‘नवोदय’च्या मुलांना मराठी ही तृतीय भाषा शिकविण्यासाठी हे दोन महाराष्ट्रीयन शिक्षक तिथे शिकवायला होते. त्यांच्याशी बोलून आम्हाला बराच धीर आला. या शाळेचे प्राचार्य जॉन्सन सर हे मूळचे दक्षिण भारतीय होते. त्यांना “खो – खो’ची विशेष आवड होती. महाराष्ट्रीयन मुले या खेळात मुळातच हुशार असायची. त्यामुळे त्यांचा आमच्यावर विशेष लोभ होता.
खो – खो स्पर्धेसाठी आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे बारनला पाठविण्यात आलं होतं. मी पूर्वी कधीच ट्रेनमध्ये बसलो नव्हतो. नंदुरबारच्या रेल्वे क्रॉसिंगवर कधीतरी रेल्वे बघायला मिळायची, तेवढाच काय तो माझा रेल्वेबद्दलचा अनुभव होता. ट्रेनविषयी मला नेहमीच प्रचंड आकर्षण वाटायचं. रेल्वे आतून कशी दिसत असेल ? लोक त्या प्रचंड गाडीत कसे व कुठे बसत असतील ? ट्रेनमध्ये जीव मळमळत असेल का ? रेल्वेत सीटवर सीट असतात, हे मी ऐकलं होतं. ती कशी असते, याचं मला खूपच कुतूहल होतं. ट्रेनमध्ये संडास असतो, ही तर मला चक्क थापच वाटायची. त्यामुळे मी गाडीत चढल्याबरोबर तिथं संडास शोधत फिरत होतो. आणि जेव्हा मला ते दिसलं, तेव्हा तर जगातलं आठवं आश्चर्य बघितल्यासारखंच वाटलं. डब्यात येणाऱ्या फेरीवाल्यांचेही मला फारच आकर्षण वाटत होतं. रेल्वेचा तो प्रवास मला एखाद्या जादूई नगरीतल्या सफरीसारखाच वाटला.
खो – खो स्पर्धेत जिल्हा पातळीवर जिंकल्यानंतर आम्ही क्लस्टर लेव्हलवर खेळण्यासाठी झालवडला रवाना झालो. तिथंही आम्ही उत्कृष्ट खेळ करत विजय मिळविला. क्लस्टर लेव्हलला चांगला खेळ खेळणाऱ्या मुलांना पुढे रिजनल लेव्हलला खेळण्यासाठी फरिदाबादला पाठविलं जायचं. पण क्लस्टर लेव्हलला माझा खेळ तितकासा उत्कृष्ट नसल्याने मी आणि माझे काही मित्र शाळेत परत आलो. क्लस्टर लेव्हलला जिंकल्याबद्दल सर आम्हाला ‘गदर- एक प्रेमकथा ‘हा सिनेमा बघायला घेऊन गेले. मी यापूर्वी कधीही टॉकिजमध्ये बसून सिनेमा पाहिला नव्हता. एवढ्या मोठ्या पडद्यावरचा तो सिनेमा बघून मी आश्चर्यचकीतच झालो.
पुढे कितीतरी दिवस आम्ही मुलं त्या सिनेमाचीच चर्चा करत होतो. काही दिवसांनी सुप्रिया मॅडम आम्हाला ‘ढोल मेला’ नावाची यात्रा दाखवायला घेऊन गेल्या. तिथे तर आम्ही मुलांनी खूपच धमाल केली. मोठमोठे झुले, चित्रविचित्र पोशाख केलेले लोक, त्यांची अडोती भाषा. आमच्यासाठी सर्व गोष्टी नवलाईच्याच होत्या. अटरू’ नवोदय मध्ये महाराष्ट्रातील आम्ही एकूण सोळा विद्यार्थी होतो. आमच्यामध्ये एक वेगळंच भावनिक नातं निर्माण झालं. कधी – कधी आमचं तिथल्या मुलांसोबत भांडण होत असे. अशा वेळी आम्ही सर्व नेहमीच एकत्र येऊन एकमेकांची साथ देत असू. आमची एकी अगदी पक्की होती.
एकदा आमचे भांडण खूपच टोकाला गेले. गोष्ट थेट प्राचार्य जॉन्सन सरांपर्यंत गेली. सर आम्हाला काहीच बोलले नाहीत. स्थानिक मुलांवर मात्र खूपच रागावले. ते त्यांना म्हणाले ‘वो लोग हमारे मेहमान है। इस बात का थोडा खयाल रखा करो। ‘ सरांची ही भूमिका आमच्यासाठी खूपच नवीन होती. आजपर्यंत आमचा अनुभव होता, की भांडण कुणाचंही असो किंवा चूक कोणाचीही असो शिक्षक दोघांनाही रागवत असत. पण आम्हा पाहुण्या विद्यार्थ्यांना सांभाळून घेणारे शिक्षक बघून आम्ही सर्व मुलं निःशब्दच झालो. त्यानंतर मात्र आम्ही तिथे कधीच भांडण केलं नाही.I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS) Part 35.
दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर आम्ही परत आलो. तेव्हा आम्हाला जॉन्सन सरांच्या पत्नीचं निधन झाल्याचं कळलं. पण अशा वेळी काय करावं, ते सुचत नव्हतं. कोळी सर व सुप्रिया मॅडमच्या सांगण्यावरून आम्ही सर्व मुलं सरांचं सांत्वन करायला गेलो. आतापर्यंत सरांना भेटायला कोणीच विद्यार्थी आलेले नव्हते. आम्हाला बघून त्यांना गहिवरून आले. त्यांना त्या अवस्थेत बघून आम्हालाही खूप वाईट वाटत होतं. काही वेळ त्यांच्याशी बोलून आम्ही सर्व खिन्न मनाने होस्टेलमधे परत आलो. त्या प्रसंगानंतर मात्र जॉन्सन सर आम्हाला कधीच परके वाटले नाहीत..
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
