दिनांक १७ नोव्हेंबर २०२४, अहील्यानगर/पुणे:
तोफखाना पोलिस आणि दक्षिण कमांड मिलिट्री इंटेलिजन्स यांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी दि.१५ नोव्हेंबर रात्री मोठी कारवाई करत अवैध शस्त्र विक्री व बनावट शस्त्र परवाना तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली असून, १२ बोअर रायफल, ९ रायफल, व ५८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अहिल्यानगर शहरात अवैध शस्त्र विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सत्यता तपासली. या कारवाईत शस्त्र परवाने बनावट असल्याची खात्री झाली. यासाठी पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र पाठवले असता, त्यांनी या परवान्यांना बेकायदेशीर ठरवले.

राजौरी येथील शेर अहमद गुलाम हुसेन हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरक्षा रक्षकांना १२ बोअर रायफल व बनावट परवाने मिळवून देत होता. यासाठी तो प्रत्येकी ५०,००० रुपये आकारत होता. त्याच्या सहाय्याने अन्य आठ जणांनी जिल्ह्यातील बँक आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी मिळवली होती.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यात शब्बीर मोहमंद इक्बाल हुसैन (वय ३८), महंमद सलीम ऊर्फ सालेम गुल महंमद (३२), महंमद सफराज नजीर हुसैन (२४), जहांगीर झाकीर हुसैन (२८), शाहबाज अहमद नजीर हुसैन, श्रीगोंदा (३३), सुरजित रमेशचंद्र सिंग (नेवासा), अब्दुल रशिद चिडीया (३८), तुफेल अहमद महंद गाजीया (स्वारगेट), आणि शेर अहमद गुलाम हुसैन (पुणे) यांचा समावेश आहे.

अटक केलेल्या आरोपींनी बनावट परवाने आणि कागदपत्रांच्या आधारे अहिल्यानगर, श्रीगोंदा, सोनई, आणि पुणे अशा विविध ठिकाणी नोकऱ्या मिळवल्या होत्या. या रॅकेटमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्रोत: (ऑनलाईन वृत्त)
