दिनांक २८ जून २०२६,दौंड/श्रीगोंदा:
दौंड येथील नगर मोरी चौकात पोलिसांनी शुक्रवारी (२६ जून) पहाटेच्या सुमारास एक मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडरची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी जप्त केले असून, या कारवाईत ५६ भरलेले गॅस सिलिंडर आणि वाहनासह सुमारे ५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चंद्रशेखर चव्हाण (रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन नरळे आणि होमगार्ड हडगळे हे नगर मोरी चौकात नाकाबंदी गस्त घालत होते. पहाटे पाचच्या सुमारास श्रीगोंद्याकडून दौंडच्या दिशेने येणारे एक वाहन त्यांनी चौकशीसाठी थांबवले. पोलिसांनी गाडीत काय आहे असे विचारले असता, चालक चंद्रशेखर चव्हाण हा घाबरला आणि कावराबावरा झाला. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी वाहनाची सखोल तपासणी केली असता, गाडीच्या मागील बाजूस घरगुती आणि व्यावसायिक वापराचे एकूण ५६ गॅस सिलिंडर आढळून आले. हे सिलिंडर कोठून आणले आणि कुठे नेले जात होते, याबाबत विचारणा केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. अखेर त्याच्याकडे गॅस वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी सिलिंडरसह वाहन दौंड पोलीस स्टेशनला आणले. त्यानंतर दौंडचे पुरवठा निरीक्षक यांनी घटनास्थळी येत गॅस सिलिंडर टाक्यांची पाहणी करून पंचनामा केला. गॅस ही जीवनावश्यक वस्तू असतानाही, त्याची बेकायदेशीर साठवणूक करून विक्रीसाठी वाहतूक केल्याप्रकरणी चंद्रशेखर चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम आणि त्यांचे पथक करत आहे.
स्रोत:(ऑनलाइन माहिती)
