दिनांक २७ जून २०२६,श्रीगोंदा:
भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने संत कबीर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘मुशाफिरी यात्रा’चा समारोप सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लिंपणगाव (ता. श्रीगोंदा) येथील भिल्ल वस्ती (धनगर वस्ती) येथे होणार आहे.
५ जूनपासून सुरू झालेली ही मुशाफिरी यात्रा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ८ जिल्हे, ११० गावे आणि सुमारे ३५०० किलोमीटरचा प्रवास करत भटके-विमुक्त समाजातील नागरिकांशी संवाद साधत जनजागृती करत आहे.
समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकणे, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि भटके-विमुक्त समाजाला संघटित करण्याचा या यात्रेचा उद्देश आहे.
समारोप कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सुजात (दादा) आंबेडकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. उच्चल्याकार लक्ष्मण गायकवाड राहणार आहेत. तर मा. ॲड. डॉ. अरुण जाधव आणि मा. उमाताई जाधव हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी राज्यातील विविध भागांतील भटके-विमुक्त समाजाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, समाजाच्या प्रश्नांवर मार्गदर्शन तसेच विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
या समारोप कार्यक्रमास भटके-विमुक्त समाजातील नागरिकांसह सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)
