काष्टी येथील राजकारण्यांच्या दबावामुळे श्रीगोंद्यात पोलीस यंत्रणा सुस्तावली..? १७ दिवस उलटूनही शेतकरी मारहाणीतील आरोपी मोकाट.!

दिनांक २८ जून २०२६, काष्टी/श्रीगोंदा:

आरोपींना अटक न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण आंदोलनाचा पीडित कुटुंबाचा इशारा; प्रशासनाला दिले निवेदन..

पूर्वी दिलेल्या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून राहींजवाडी (काष्टी) येथे एका ५३ वर्षीय शेतकऱ्यावर लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला करत गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल होऊन १७ दिवस उलटले, तरीही आरोपी मोकाट आहेत. काष्टी येथील स्थानिक राजकारणी या प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव निर्माण करून आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने माध्यमांशी बोलताना केला आहे. राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे पोलीस कारवाई करत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या घटनेबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी राजेंद्र तुकाराम टकले (वय ५३, रा. राहींजवाडी, काष्टी, ता. श्रीगोंदा हे आपल्या कुटुंबासह राहून शेती व्यवसाय करतात. त्यांचे शेजारी राहणारे कांतीलाल अशोक राहींज व अशोक पांडुरंग राहींज यांनी शेताचा बांध कोरल्याने टकले यांनी ११ जून २०२६ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली होती.

याच तक्रारीचा राग मनात धरून, १२ जून २०२६ रोजी रात्री ८:२० वाजण्याच्या सुमारास संकेत धोंडीबा राहींज याने फिर्यादी राजेंद्र टकले यांना फोन करून ते कुठे आहेत याची माहिती घेतली.

त्यानंतर टकले हे आपल्या वाहनाने काष्टी ते राहींजवाडी रोडने घराकडे चालले असताना, राहींजवाडी येथील वॉटर फिल्टरजवळ पाणी भरण्यासाठी थांबले. त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांना घेरले. “आमच्याविरुद्ध तक्रार का करतोस? आज तुझा काटाच काढतो,” असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

या जीवघेण्या मारहाणीत आरोपी कांतीलाल अशोक राहींज आणि सागर सर्जेराव राहींज यांनी हातातील लोखंडी गजाने राजेंद्र टकले यांच्या डोक्यात गंभीर वार करून त्यांना रक्तबंबाळ केले. तसेच दीपक कैलास राहींज याने पोटात लाथ मारून त्यांना खाली पाडले व इतरांनी बेदम मारहाण केली.

याच गदारोळाचा फायदा घेऊन आरोपी कांतीलाल राहींज याने फिर्यादीच्या गळ्यातील १ तोळा वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने ओढून घेतली. “पुन्हा नादी लागलास तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपी तेथून पसार झाले. जखमी अवस्थेत टकले यांनी घर गाठले व नातेवाइकांंसमवेत श्रीगोंदा पोलीस ठाण्यातून मेडिकल मेमो घेऊन ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले व रीतसर फिर्याद नोंदवली.

पीडित शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी राहींजवाडी (ता. श्रीगोंदा) येथील १. कांतीलाल अशोक राहींज,२. सागर सर्जेराव राहींज,३. दिपक कैलास राहींज,४. संभाजी आप्पा राहींज,५. अशोक पांडुरंग राहींज,६. आप्पा पांडुरंग राहींज,७. संकेत धोंडीबा राहींज यांच्यावर गंभीर आणि दखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संभाजी आप्पा राहींज, कांतीलाल अशोक राहींज आणि सागर सर्जेराव राहींज यांचा अंतरिम जामीन न्यायालयाने नाकारला आहे. असे असतानाही हे आरोपी राजरोसपणे गावात आणि त्यांच्या घरी ये-जा करत आहेत. “आरोपी आमच्या डोळ्यांसमोर फिरत असूनही पोलीस त्यांना अटक का करत नाही?” असा सवाल पीडितांनी केला आहे.

  • तीन-चार दिवसांपूर्वी आरोपींनी पुन्हा एकदा पीडित कुटुंबाला धमकावले. जीव वाचवण्यासाठी कुटुंबाने तातडीने ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर पोलिसांना फोन केला. मात्र, पोलीस यंत्रणेने कमालीची दिरंगाई दाखवत तब्बल ३ ते ४ तासांनंतर घटनास्थळ गाठले.
  • घातक शस्त्राने जीवघेणी मारहाण करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि दंगल घडवने About Nirbhidkalam यांसारखे गंभीर दखलपात्र गुन्हे दाखल असूनही, पंचनाम्याव्यतिरिक्त पोलीस एकदाही घटनास्थळी आलेले नाहीत. १७ दिवस उलटूनही तपास अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.

काष्टी येथील स्थानिक राजकारण्यांच्या दबावापोटी पोलीस आरोपींना अटक करत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. जर पोलिसांनी तात्काळ राजकीय दबाव झुगारून आरोपींना अटक केली नाही, तर उद्या दिनांक २९ जून २०२६ वार सोमवार रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा पीडित राजेंद्र टकले व त्यांच्या कुटुंबाने दिला आहे. या संदर्भातील मागणीचे लेखी निवेदन त्यांनी स्थानिक प्रशासनाला सादर केले आहे.

स्रोत:(निवेदन आणि पीडितांची मुलाखत)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading