दिनांक ३० जून २०२६ श्रीगोंदा (लिंपणगाव):
भटके-विमुक्त आणि आदिवासी समाजाचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचे असतील तर महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात आणावी लागेल. त्यासाठी समस्त भटके-विमुक्त आणि आदिवासी समाजाने एकजूट होऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी काल आयोजित कार्यक्रमात केले.
भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने संत कबीर जयंतीनिमित्त लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील सभागृहात आयोजित मुशाफिरी यात्रेच्या समारोप सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
सुजात आंबेडकर म्हणाले की, भटके-विमुक्त समाजावर अनेक वर्षांपासून अन्याय झाला आहे. ब्रिटिशांविरुद्ध लढा देणाऱ्या या समाजाला स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही राहण्यासाठी घर, जमीन, रेशन, शिक्षण अशा मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने भटके-विमुक्त समाजाला सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्धार केला आहे. तसेच डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाला बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही भटके-विमुक्त समाज पालात राहत आहे, तर सत्ताधारी महालात राहतात. आंबेडकरी विचारांमुळे या समाजाला नवी दिशा मिळाली असून शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या माध्यमातूनच समाजाचा विकास शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी घरगणना आणि जनगणनेत भटके-विमुक्त समाजाची योग्य नोंद होत नसल्याची खंत व्यक्त केली. मुशाफिरी यात्रेमुळे अनेक कुटुंबांची घरगणना झाली असून समाजाच्या विविध समस्या शासनापर्यंत पोहोचल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी सनदशीर आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अंबरसिंग चव्हाण, बाळासाहेब बळे, भालचंद्र सावंत, अनिल जाधव, संतोष चोळके, अनिल सावंत, लता सावंत, अनिल घनवट, संतोष जौंजाळ आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आप्पा सोनवणे, अशोक मोरे, सोमनाथ भैलुमे, बाबुराव फुलमाळी, चंद्रकांत नेटके, रोहित गजरमल, रूपचंद सावंत, आसाराम काळे, संतोष भोसले, छाया भोसले, अशोक मोरे, राजश्री लष्करे, सुभाष कांबळे, रोहित रोडे, बाबुशा चव्हाण, गोरख शिंदे, नवनाथ शिंदे, बाबासाहेब ओहोळ, विशाल पवार, राहुल पवार, ललिता पवार, अविनाश पवार, काजूरी पवार, दिगंबर पवार, रजनी बागवान, उर्मिला कवडे, राजू शिंदे, ऋषी गायकवाड, सचिन भिंगारदिवे, तुकाराम शिंदे, सुमित भालेराव, पप्पू भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी, तर आभारप्रदर्शन उमाताई जाधव यांनी केले.
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)
