श्रीगोंदा | १८ डिसेंबर २०२५ :
श्रीगोंदा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ (ब) च्या पोटनिवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात असताना, शहरात एका खळबळजनक प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शहरातील एका वादग्रस्त नगरसेवकाने एका उद्योजकाच्या मुलाला थेट ‘उडवून टाकण्याची’ भाषा केल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. यामुळे निवडणूक प्रचारात आता वैयक्तिक धमक्या आणि संघर्षाचे पडसाद उमटू लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग ७ (ब) च्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान एका नगरसेवकाने उद्योजकाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. हा नगरसेवक यापूर्वीही विविध गंभीर आरोपांमुळे चर्चेत राहिला आहे.

विशेष म्हणजे, दूध भेसळ प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणूनही या नगरसेवकाचे नाव चर्चेत समोर येत होते. दारूच्या व्यसनामुळे आणि वादग्रस्त वर्तनामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या या लोकप्रतिनिधीने पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
स्वतःच्या मुलाला धमकी मिळाल्यानंतर संबंधित उद्योजकाने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी रात्री पत्रकारांना फोन करून पत्रकार परिषदेचे निमंत्रण दिले होते. नगरसेवकाच्या कृत्याचा जाहीर पंचनामा करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, गुरुवारी सकाळी अचानक ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली.
“निवडणूक प्रक्रिया सुरू असताना पत्रकार परिषद घेतली तर त्याचे निवडणुकीवर वेगळे पडसाद उमटतील. त्यामुळे निवडणुकीनंतर या प्रकरणाचा सविस्तर ओहापोह करून खुलासा करणार आहे,” असे स्पष्टीकरण संबंधित उद्योजकाने दिले आहे.
या प्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त झाले आहे. ज्या उद्योजकाच्या मुलाला धमकी देण्यात आली, तो उद्योजक भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अत्यंत निकटवर्ती असल्याचे बोलले जाते.
मात्र, या प्रकरणाबाबत भाजपच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी समाधानकारक उत्तर देणे टाळले. यामुळे हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
धमकीसारख्या गंभीर प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार देण्याऐवजी पत्रकार परिषदेचा मार्ग का निवडला गेला.?
ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे आरोप होणे हा राजकीय सुडाचा किंवा समीकरणाचा भाग तर नाही ना.? अशी चर्चा शहरात रंगली आहे.
रात्री पत्रकार परिषद जाहीर करून सकाळी ती रद्द करण्यामागे नेमका कोणाचा दबाव होता.? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या या प्रकरणाची श्रीगोंदा शहरात मोठी चर्चा असून, संबंधित नगरसेवकावर कारवाई होणार की, हे प्रकरण निवडणुकीच्या रणधुमाळीत दाबले जाणार.? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
