दिनांक १ मे,(आढळगाव, श्रीगोंदा):
तालुक्यात आढळगाव कार्यक्षेत्रातील देवनदी व घोडेगाव पाझर तलावात अनधिकृत वाळू उपसा होत असलेबाबत अनेक दिवसांपासून आढळगाव ग्रामपंचायतीमध्ये चर्चा सुरू होती. हा अनधिकृत गौण खनिज उपसा थांबवण्यासंदर्भात काल झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते आढळगाव कार्यक्षेत्रातील वाळूतस्करी बंद करण्याविषयी ठराव संमत करण्यात आला. उपसरपंच अनुराधाताई ठवाळ यांनी याबाबत मागणी केली होती. यानंतर मंजूर झालेल्या या ठरावाबाबत उद्विग्न होऊन, येथील वाळू तस्करांचा पंटर व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला रघुनाथ प्रकाश शिंदे याने राग अनावर झाल्याने, पत्रकार तथा संपादक अनिल भगवान ठवाळ यांना आढळगाव एसटी स्टँड जवळ आडवून, सार्वत्रिक अपमानीत करीत, जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय, अनेक लोकांमध्ये एक महिन्याच्या आत झिलेटिनने ठवाळ यांचे घर उडवून देण्याचे ही धमकी दिली. या प्रकरणी अनिल ठवाळ यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला रघुनाथ शिंदे या गुंड प्रवृत्तीच्या इसमावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

तालुक्यात चालू असलेल्या अनधिकृत वाळू तस्करीबाबत अनिल ठवाळ यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर डॉ.राजेंद्र भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना या अवैध गौण खनिज उतख्तन्न थांबवण्यासंदर्भात पत्र दिले. प्रशासनाच्या वरदहस्ता शिवाय तालुक्यातील भीमा, घोड, देवनदी, सरस्वती नदी, ओढे, नाले, तलाव, बंधारे याठिकाणी वाळू तस्करी होणे अशक्य आहे. प्रशासनाच्या मध्यस्थीने हा गैरकारभार चालू असून, तालुक्यातील नदीपात्र नागडे करण्याचे काम सरेआम चालू असल्याचे मत ठवाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. या अनधिकृत प्रक्रियेतून मिळणाऱ्या पैशांच्या माध्यमांतून वाळू तस्कर व त्यांचे बगलबच्चे, चेले, चपाटे हे मग्रूर झाले असून, त्यांना प्रशासनाचा धाक राहीलेला नाही. जनप्रतिनिधी, सामाजिक व राजकीय प्रक्रियेत सक्रिय असलेले पदाधिकाऱ्यांनाही ते ओळखू शकत नसल्याने, त्यांचा सार्वत्रिक अपमान करणे, दम देणे, मारहाण करणे, अश्लील शब्द वापरणे, जिलेटिनने घर उडवण्याची असंविधानिक भाषा करणे. (In Shrigonda .. Sand smuggler threatens to kill journalist and blow up house with gelatin ..) या सर्व अनधिकृत प्रक्रियेला बळ देण्यास स्थानिक प्रशासन जिम्मेदार असल्याचे ठवाळ यांनी माध्यमांना सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांच्या जीवावर उठलेल्या तालुक्यातील वाळू तस्करांना संपुष्टात आणण्यासाठी लवकरच जनआंदोलन करणार असल्याचे यावेळी अनिल ठवाळ यांनी सांगितले आहे. ठवाळ हे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची मान्यता असलेल्या साप्ताहिक जागृती या वर्तमानपत्राचे संपादक आहेत. अशा पद्धतीने पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकाऱ्यांवर अश्लील, अर्वाच्च, गैरसंविधानिक, एकेरी भाषेचा वापरून धमकी देणाऱ्या रघुनाथ शिंदेला तात्काळ अटक करून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
स्रोत:(अदखलपात्र गुन्हा)
