त्यांनी माझी व माझ्या राहुल नावाच्या एका मित्राची त्यासाठी निवड केली स्वतःच आमचे फॉर्म भरले. त्या फॉर्मसाठी पासपोर्ट साइज फोटो लागणार होते. तेही त्यांनी स्वतःच्याच खर्चाने काढून घेतले. एवढे करूनच ते थांबले नाहीत. तर, ते शाळा सुरू व्हायच्या एक तास आधी शाळेत येऊन आम्हाला’ नवोदय’च्या परिक्षेबद्दल मार्गदर्शन करायचे. त्यांच्या मार्गदर्शनाला मी शिकवणी यासाठी म्हणत नाही. कारण त्यासाठी त्यांनी आमच्याकडून काहीही मागितलं नाही. त्यांना तशी अपेक्षाही नव्हती. त्यांना तर फक्त ज्ञान द्यायचं होतं. त्यांनी आम्हाला गणित, भूमिती व भाषा या विषयांचे सखोल ज्ञान दिले. त्यातील प्रत्येक घटक आम्हाला समजावून सांगितला. आमची अगदी परिपूर्ण तयारी करून दिली.

फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी आमची परीक्षा होती. त्या दिवशी ते स्वतः बसने मला व राहुलला घेऊन ‘नवोदय’च्या परिक्षेचे ठिकाण असलेल्या साक्रीला घेऊन गेले. तेथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आमची परीक्षा होती. परीक्षा हॉलमध्ये माझा नंबर पहिल्याच बाकावर होता. आम्हाला पेपर दिला गेला. दोन तासांचा अवधी असलेला तो पेपर मी अर्ध्या तासातच संपवला. पण पूर्ण दोन तास झाल्याशिवाय वर्गाबाहेर निघता येत नसल्यामुळे पुढचा दीड तास मी तसाच बसून होतो. पेपर सुटल्यावर जेव्हा ही गोष्ट घरटे सरांना कळली तेव्हा ते माझ्यावर रागावले. त्यांनी म्हटलं, की ‘एवढी घाई करायची काय गरज होती. पेपर नेहमी आरामात सोडवायचा. पण मी त्यांना म्हटलं, की नव्हती. ‘सर, पेपर एवढा सोपा होता की, दोन तासांची आवश्यकताच त्यावर सर काही बोलले नाही.
आम्ही सर्वांनी सोबत आणलेले डबे उघडून जेवण केलं व परत सामोड्याची बस पकडली. घरी आल्यानंतर पेपर चांगला गेल्याचं आईलाही सांगितलं, तेव्हा आई काही न बोलता देवाजवळ गेली व दिवा लावून देवाला नमस्कार केला. काही दिवसांनी माझा पाचवीचा निकाल लागला. यावेळीही मी पहिला आलो होतो. ताई यावर्षी दहावीत नापास झाली होती. तिची पुढे शिकायची इच्छाही नव्हती. म्हणून, आईने तिचं लग्न करायचं ठरविलं.
भिलाटीतीलच गवंडीकाम करणाऱ्या अनिल यांच्याशी तिचं लग्न झालं. त्यांचं घर आमच्या घरापासून जवळच होतं. त्यामुळे ती लग्न होऊनही घरातच राहत असल्यासारखी वाटत असे. आणि ती जवळ असल्याने आईलाही मोठा आधार होता.

ताईच्या लग्नानंतर काही दिवसांनी एक पोस्टमन खाकी रंगाचं एक मोठं पार्सल घेऊन आमच्या घरी आले. आम्हाला सर्वांना नवल वाटलं, की आपल्या घरी हे एवढं मोठं पार्सल कुणी पाठवलं म्हणून. कारण, त्याआधी साधं पत्रही कधी आल्याचं मला आठवत नाही. आईने ते पार्सल माझ्याकडे दिलं व काय आहे ते बघायला सांगितलं. मी ते पार्सल फोडलं व आतील पत्र सवयीप्रमाणे मोठ्याने वाचू लागलो. “कुमार राजेंद्र भारूड यांची निवड नवोदय विद्यालय अक्कलकुवा, नंदुरबार येथे करण्यात आली आहे. ते वाचून सगळ्यांना धक्काच बसला. कारण फॉर्म भरतेवेळी ती परीक्षा नेमकी कशासाठी आहे, हे मला व घरी कुणालाच माहीत नव्हतं. सरांनीही आम्हाला त्याबद्दल काही सांगितलं नव्हतं. (I had a dream! Dr. Rajendra Bharud .. (IAS). Part 26.)
दुसऱ्या दिवशी मी ते पत्र घरटे सर व बडगुजर सरांना दाखवलं. पत्र पाहताच त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी माझं अभिनंदन करत मला सांगितलं की, मी ‘नवोदय’ची परीक्षा पास झालो. आणि मला आता अक्कलकुव्याच्या फार नामांकित व मोठ्या सरकारी शाळेत प्रवेश मिळाला आहे. नंतर त्यांनी आईलाही या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. त्या शाळेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, हेही त्यांनी नीट समजावून सांगितलं. आई मात्र, वेगळ्याच विचारात होती. आतापर्यंत तिला माहीतही नव्हतं, की तिचा मुलगा तिच्यापासून लांब दुसऱ्या गावी शिकायला जाणार. एकीकडे माझ्या यशाचा तिला आनंदही होत होता. व दुसरीकडे मी तिच्यापासून दूर जाणार, याची हुरहूरही होती. पण एव्हाना शिक्षणाचं महत्त्व तिला उत्तमरीत्या कळलं होतं. त्यामुळे आपला मुलगा आता मोठा माणूस होणार, हा विचार करतच ती अक्कलकुव्याला जायची तयारी करत होती.
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
