मी एक स्वप्न पाहिलं .! डॉ.राजेंद्र भारुड (IAS)..भाग २७.

माझ्या आयुष्याचा नवोदय

१९९८ माझी ‘नवोदय ला जाण्याची तयारी पूर्ण झाली होती. आम्हाला आधी अक्कलकुव्याच्या नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायचा होता व त्यानंतर आठवडाभरातच मला कायमस्वरूपी राहायला जायचं होतं.

त्यावेळी भाऊ आश्रम शाळेत शिकत असल्याने घरी आई व मी दोघेच होतो. कुणीतरी सोबत असावं म्हणून, आईने आमच्या घरी दारू प्यायला येणाऱ्या एका ओळखीच्या माणसाला सोबत घेतलं. पावसाळ्याचे दिवस होते. सरांनी सांगितल्याप्रमाणे कागदपत्रां व्यतिरिक्त इतर कोणतंही सामान सोबत घेतलं नव्हतं. सामोड्याला बस थांबत नसल्याने पिंपळनेरला जाऊन बस पकडली.

मला बसच्या प्रवासाची सवय नव्हती. शिवाय रस्तेही खूप खराब झाले होते. मला मळमळ व्हायला लागली. नंदुरबारच्या नागमोडी घाटात मला दोनदा उलटी झाली. नदी – नाले, घाट ओलांडत आमची बस दुपारी अक्कलकुव्याला येऊन पोहोचली.

शाळेचा परिसर खूपच मोठा होता. सभोवती तारेचं कुंपण होतं. आम्ही मुख्य गेटमधून प्रवेश केला. तेव्हा मला एका नवीन जगात प्रवेश करत असल्याची जाणीव होत होती. असं वाटत होतं, की नियती दोन्ही हात पसरून आपले स्वागत करत आहे. ही नवीन शाळा एवढी मोठी असेल, याची मला कल्पना नव्हती. एवढं मोठे पटांगण, हिरवीगार वनराई, नीटनेटके रस्ते, बगीचे, दोन मजली वसतिगृह, टिचर्स क्वार्टर्स हे सर्व बघत – बघतच आम्ही ऑफिसजवळ आलो.

काही वेळाने आम्हाला आत बोलाविण्यात आलं. तिथेच आम्हाला साक्रीचे देवरे सर भेटले. त्यांनी आम्हाला अॅडमिशनची पद्धत नीट समजावून सांगितली. नवोदय विद्यालयात माझा दाखला करून आणि देवरे सरांचे आभार मानून आम्ही तिथून बाहेर पडलो. ती शाळा एवढी छान होती, की मला तर कधी एकदा मी शाळेत येतो असं झालं. त्याक्षणी मला जाणीवही झाली नाही की मी आईपासून, आपल्या मित्रांपासून दूर जाणार आहे. आई मात्र मी दूर होणार या विचाराने अतिशय खिन्न झाली होती. भाऊ आधीच आश्रमशाळेत होता. आता मीही अक्कलकुव्याला आल्यानंतर घरी ती एकटीच उरणार होती.

https://bit.ly/bspmycityshrigonda

शेवटी सामोड्याला परत आल्यावर न राहवून ती मला म्हणाली “तू आठेज शिक. इतली दूर जावानी काय गरज नही. “मला ते ऐकून थोडा धक्काच बसला. माझ्या शिक्षणासाठी एवढं सोसणारी आई, असं कशी काय म्हणू शकते! याचं मला आश्चर्य वाटत होतं. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. शिकून मी मोठा होईन, अधिकारी होऊ शकेन वगैरे. पण आईची माया हे सगळं ऐकून घेण्यास तयार नव्हती. तिच्या काळजाचा हा छोटासा तुकडा तिच्यापासून एवढ्या दूर कसा राहू शकेल? या काळजीपोटी माझ्या जाण्याला ती विरोध करत होती. आपल्या गावातील श्रीमंतांची मुलं, जर गावातच शिकतात, तर मी बाहेर शिकायला का जावं? असं तिला पुन: पुन्हा वाटत होतं. ‘नवोदय मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पैसा नाही, तर हुशारी लागते. त्यामुळे श्रीमंतांची मुलं इच्छा असूनही तिथं प्रवेश घेऊ शकत नाही. पण आई काही ऐकून घेण्यास तयार नव्हती. शेवटी नाइलाजाने तीचं मला ऐकावं लागलं. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो. मला पाहून बडगुजर सरांना आश्चर्य वाटलं. घडलेली गोष्ट मी सरांना सांगितली. एकीकडे मुलं नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी जीवाचं रान करत असतांना, मी मात्र, प्रवेश मिळूनही जात नसल्याचं पाहून त्यांना वाईट वाटलं. उच्च दर्जाच्या सरकारी शाळेत मोफत शिक्षण मिळत असताना आईच्या अज्ञानामुळे मी तिथं जाऊ शकत नव्हतो. संध्याकाळी घरी येऊन आईशी बोलेन, असं सांगितलं.

मावळतीला बडगुजर सर माझ्या घरी आले. चहा – पाणी झाल्यावर थोड्या रागातच आईला बोलले “तुम्ही पोयले अक्कलकुव्याले नही धाडी राइनात? ‘आईनं काकुळत्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं व सरांना म्हणाली “एवढ्या धाकल्या पोयले इतला दूर कशी धाडू ? धाकलंपन पयतीन मना जोडे रहमेल शे, त्येनाशिवाय मी एक दिन राहू शकाव नही. आनी अशाबी बाकी लोकेसना पोऱ्या गावमा शिकतयस ना, मना पोयाबी गावमा शिकी “बडगुजर सरांनी आईचं म्हणनं ऐकून घेतलं. त्यांना आईचं मन कळत होतं, पण पुन्हा माझ्याकडे पाहत ते तिला समजावू लागले.” बाई, आसं नको करू. पोयले ‘नवोदय’मा धाड. त्यानं कल्याण व्हयी जाई. जास्त पोयामा जीव नको घालू. तुम्ही लोके जन्मभर काम करश्यात, पण हाऊ बाहेर शिकी ते तुमनं जीवन कायमनं बदली जाई. तुमनासारखाच आमनाजी गण जीवशे पोयमा. आमना आवडता विद्यार्थी शे तो, पण आमना शाळापेक्षा त्यानं स्वत:नं आयुष्य जर चांगला व्हयी, तो जर स्वत: ना पायवर उभा राहिना ते आमले चांगलं वाटी “असं बराच वेळ समजावून शेवटी त्यांनी आईला तयार केलं. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांचा पाया पडलो. तेव्हा मायेनं माझ्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले “राजू, ‘नवोदय मध्ये गेल्यावर चांगला शिक. खूप अभ्यास कर. आपल्या आईचं, शाळेचं, आपल्या गावाचं नाव तू मोठं कर. मिळालेल्या संधीचं सोनं कर. “मी तेव्हाच मनोमन ठरवलं, की सरांनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या करून दाखवायच्या.

आज जेव्हा मी कलेक्टर झालो. ते बघण्यासाठी बडगुजर सर नाहीत, याचं मला खूप दुःख वाटतं. कोणत्या तरी मोठ्या गोष्टीला मी मुकलो असं मला वाटतं. कदाचित त्या दिवशी त्यांनी आईला समजावून सांगितलं नसतं, तर मी कुठल्या तरी दुसऱ्याच वाटेवर राहिलो असतो. जेव्हा सर्वजण मला म्हणतात, की ‘राजू, तू सामोड्याचं नाव मोठं केलंस’, तेव्हा हेच शब्द बडगुजर सरांच्या तोंडून ऐकताना मला खरं समाधान मिळालं असतं. मला मनापासून त्यांना सांगायचं होतं, की ‘सर, आज तुमच्यामुळेच मी इथवर येऊ शकलो. तुमच्यासारखे शिक्षक मिळाले, हे माझं भाग्य होतं. यातील काहीच ऐकायला आज बडगुजर सर जिवंत नाहीत. पण, त्यांचा प्रेमळ हात मला आजही माझ्या डोक्यावरून फिरत असल्यासारखा वाटतो. (I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS) .. Part 27.)

माझा ‘नवोदयला जाण्याचा दिवस जवळ येत होता. मला आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आईने विकत आणल्या. आईने माझ्यासाठी बाजारातून पेटी, बादली, छत्री व पावसाळी बूट विकत आणले. या सर्व वस्तू मी आयुष्यात प्रथमच वापरणार होतो. शाळेचा गणवेष, पुस्तके, वह्या, दप्तर इत्यादी वस्तू मला शाळेकडून मिळणार होत्या. अक्कलकुव्याला जाण्याच्या एक दिवस आधी मी माझ्या सर्व शिक्षकांची, माझ्या सर्व मित्रांची भेट घेतली. शिक्षकांनी प्रेमाने मला आशीर्वाद दिले. काहींनी मला भेट म्हणून पेन, वही अशा वस्तू दिल्या. आईने माझे धुतलेले कपडे, रुमाल, मला खाण्यासाठी बनविलेला चिवडा व

क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)

Leave a Reply