आवश्यक सर्व वस्तू पेटीत ठेवून कुलूप लावले. चावी काळजीपूर्वक माझ्या कमरेच्या करदोड्याला बांधली. वगैरे दुसऱ्या दिवशी सकाळी आईनेच माझी आंघोळ करविली. पूजा झाल्यावर सर्व शेजाऱ्यांना नमस्कार करून येण्यास सांगितलं.

ताई माझ्या सोबतच होती. आजूबाजूच्या सर्व बायका माझं कौतुक करत होत्या. काही भिल्ल बायका तर ‘एवढा धाकला पोयले कोणता देसमा धाडी हायनात’, असं विचारत होत्या. काहींनी माझ्या हातावर साखर ठेवली. निरोप घेत – घेत मी मावशीच्या घरी गेलो. मावशी, मावसांच्या पाया पडलो. मावसा – मावशीनं प्रेमानं आशीर्वाद दिला. माझ्या यशाच्या प्रवासात त्या दोघांचाही मोलाचा वाटा आहे. मी नियमित शाळेत गेलो पाहिजे, याकडे दोघांचंही बारीक लक्ष असायचं.
एका पावसाळ्यातील ही गोष्ट आहे. इंदिरानगरातील लोकांचे पावसामुळे खूप हाल व्हायचे. वस्तीच्या चहूबाजूंनी तळं साचलेलं असायचं. आमच्या घरापुढे एक मोठा नाला होता. नाला कसला छोटी नदीच ! पाऊस पडून गेल्यावर हा नाला तुडुंब भरून वाहायचा. पावसाचा जोर कायम राहिला, तर कधी – कधी आमच्या वस्तीचा गावाशी संपर्कसुद्धा तुटायचा. त्यामुळे पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी खूप कसरत करावी लागायची. अशा वेळी माझे मावसा मला व माझ्या मावसभावाला शाळेत सोडायला येत. तुडुंब भरून वाहणारा नाला त्यांच्या खांद्यावर बसून पार करताना खूप मजा यायची. वासुदेव जणू कृष्णाला नदीपार घेऊन जात आहेत, अशी कल्पना मी करत असे.
मला तो दिवस अजूनही आठवतो. त्या दिवशी नाल्यामध्ये पाणी जरा जास्तच होतं. मावसांनी मला एका खांद्यावर व माझ्या मावसभावाला दुसऱ्या खांद्यावर बसवलं. एका हातात दप्तर आणि दुसऱ्या हाताने मावसाचं डोकं घट्ट धरून आम्ही बसलो. तोल सांभाळत मावसा हळूहळू नाला पार करू लागले. अर्ध्यापेक्षा अधिक अंतर चालून झाल्यावर जे होऊ नये तेच घडलं. अचानक मावसांचा पाय घसरला आणि धाडकन ते पाण्यात पडले. काही कळायच्या आत आम्ही दोघंही नाल्यात कोसळलो. भेदरलेल्या अवस्थेत धडपडत किनारा गाठला. तोपर्यंत आम्ही पूर्ण भिजलो होतो. हातापायाला, कपड्यांना चिखल लागला होता, तरीही मावसांनी आम्हाला तशाही अवस्थेत शाळेत जायला सांगितलं. आमची कोणतीही सबब त्यांच्यापुढे चालू शकली नाही. ते स्वत: अशिक्षित होते, पण अशा कितीतरी प्रसंगांतून मावसा व मोठमायने माझ्या मनावर शिक्षणाचं महत्त्व बिंबवलं.
मोठमायला भेटून घरी आलो, तेव्हा सर्व मित्र माझी वाट बघत घराबाहेर उभे होते. “राज्या आत्ते मोठा माणूस व्हवाले दूर चालना. आत्ते आपला तो कायमना इसरी जाई. “माझा एक मित्र उदासपणे बोलला. मित्रांच्या प्रेमाला काय उत्तर द्यावं, हे मला कळत नव्हतं. भरल्या डोळ्यांनीच मी सर्वांचा निरोप घेतला. बसमध्ये आई माझ्या केसांतून वारंवार हात फिरवत होती. मलाही मी तिच्यापासून दूर होत असल्याच्या भावनेनं खूप रडायला येत होतं. कितीतरी वेळ झोपेचं सोंग घेऊन मी आईच्या मांडीवर पडून होतो. हा प्रवास कधीच संपू नये, असं मनापासून वाटत होतं. पूर्ण प्रवासात आई काहीच बोलली नाही. हळूवार हातांनी माझं डोकं पूर्णवेळ केवळ थोपटत होती. विचारांच्या गर्दीत अक्कलकुवा कधी आलं, हे कळलंच नाही. उतरल्यावर तिने माझी पेटी डोक्यावर घेतली व बादली माझ्या हातात देऊन थेट शाळेच्या दिशेने चालू लागली. ‘भाऊ, कोणासंगे कज्या, भानगड करानी नही. संगळास संगे प्रेमतीन वागाणं. चांगलं शिकीसन मोठं व्हावानं. आते आठला मास्तर म्हणजेच तुनी ” माय. एवढं बोलून ती गप्प झाली. त्यानंतर शाळा येईपर्यंत ती काहीच बोलली नाही. काहीतरी सांगायचा ती प्रयत्न करत होती, पण तिच्या तोंडून शब्द निघत नव्हते. तिने हळूच पदराने डोळे पुसले. (I had a dream! Dr. Rajendra Bharud .. (IAS). Part 28)
शाळेत पोहोचल्यावर एक शिक्षक जे आमचे हाऊसमास्टर होते, त्यांनी आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं. आमच्या शाळेत त्यावेळी मुलांसाठी चार हाऊस होते. त्यांनी मला सातपुडा हाऊसमध्ये टाकलं. एका मुलाला बोलावून त्याला मला हाऊस दाखवायला सांगितलं. त्याने माझं सामान घेतलं. हा मुलगा आमचा हाऊस लीडर होता. त्याने आम्हाला एका खोलीत नेलं. त्या खोलीत अनेक डबलताली बेड होते. त्यापैकी एका बेडच्या खालच्या तळावर असलेलं बेड मला मिळालं. बेडवर टाकण्यासाठी बेडशीट, चादर व ब्लँकेट तिथंच असलेल्या स्टोअरमधून मिळाल्या. आजूबाजूला बरीच हुशार मुलं होती. ती अस्खलित व शुद्ध मराठी बोलत होती. आईने त्यातल्याच एका मुलाला विचारलं…
क्रमशः
स्त्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
