“भाऊ, आठे खावा – पेवाले ते बरं भेटस ना? “त्या माझ्याच वयाच्या चुणचुणीत पोराने पटकन् उत्तर दिलं “मावशी, आम्ही इथं खायला – प्यायला नाही, तर अभ्यास करायला आलो आहेत. आईला काय वाटत होतं, हे त्याला तरी कसं कळणार ! त्याने आपलं प्रामाणिक उत्तर दिलं. त्याच्या उत्तराने मात्र काय बोलावं, हेच आईला समजत नव्हतं. दोनवेळच्या पोटभर न्याहरीपेक्षा जगात काही महत्त्वाचं असतं, हे त्या माऊलीच्या कल्पनेबाहेर होतं. खासगी शाळांमधून चालणाऱ्या स्पर्धाचा गंधही नसल्यामुळे आमच्या भिलाटीत शाळांमधून केवळ पास होणे महत्त्वाचे होते. कोणाला किती मार्कस्याच्याशी कोणाला काहीही देणं – घेणं नसे.

आम्ही दोघंही सातपुडा हाऊसमधून बाहेर पडलो. आत्तापर्यंत संयम ठेवून असलेल्या आईचे डोळे आसवांनी डबडबले होते. तिची अवस्था बघून माझ्याही मनात कालवाकालव होत होती. गेटजवळ येताच आईने मला घट्ट छातीशी धरलं वम्हटलं” भाऊ, घरनी याद करानी नही. म्हनी जास्त आठवण काढानी नही. जे बी खावाले बरं – माळं भेटी ते खाईसन दिवस काढीलेवाना. महिनाकाठीले घर एक पत्र यादयेनं धाडी देवानं. ‘आईचं बोलणं ऐकून मीही रडू लागलो. तितक्यात शाळेचा चौकीदार तिथं आला व माझा हात धरून आईला म्हणाला “बाई, तुम्ही आता बेफिकीर घरी जा, कसलीही काळजी करू नका. आम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष देऊ.” आईने लुगड्याच्या पदराने माझे डोळे पुसले. आपलेही डोळे कोरडे करत मला म्हणाली “समदाशी छान रही. अभ्यास करीसन मोठा माणूस व्हयी. “एवढं बोलून व माझा मुका घेऊन ती माझ्याकडे पाठ करून भराभर जाऊ लागली. तिला तसं जाताना पाहून मला गलबलून आलं. असं वाटलं, की जगात आपण एकटेच आहोत. आजूबाजूच्या जगाचं अस्तित्तच मला जाणवत नव्हतं. रितेपणाची इतकी तीव्र भावना याआधी मी कधीच अनुभवली नव्हती. आईच्या सहवासापेक्षा मला ती शाळा, ते शिक्षण, ते मोठं स्वप्न यापैकी काहीच हवंसं वाटत नव्हतं . त्यावेळी मला फक्त माझी आई हवी होती. न राहवून मी माझ्या पाठमोऱ्या आईकडे बघून मोठ्याने ओरडलो – “मा, मालाबी संग ली चाल. माला नहीं शिकना अठी”. मी जोरजोराने रडत होतो. मला रडताना बघून आईलाही रडू कोसळलं. पण ती थांबली नाही. ती कठोर निर्धाराने तशीच पुढे जात राहिली. चौकीदाराने मला घट्ट धरून ठेवलं होतं. माझ्या डोळ्यांतील आसवांनी आईची प्रतिमा हळूहळू अस्पष्ट होत गेली. मी जोरजोराने हुंदके देत रडत होतो . माझ्या तोंडून एकच शब्द निघत होता, मा… मा… मा…
त्या दिवशी आई परत गेल्यावर मी उदासपणे बराच वेळ उशीत डोकं खुपसून रडत बसलो होतो. थोड्या वेळाने एक मुलगा तिथे आला. मधुकर भोये त्याचं नाव. मधुकर नंदुरबारचा, कोकणी समाजातील मुलगा होता. यापूर्वी आश्रमशाळेत राहिलेला असल्याने होस्टेलचं आयुष्य त्याच्या अंगवळणी पडलं होतं. त्याने हळूच हात लावून मला उठवलं. मी रडवेल्या डोळ्यांनीच त्याच्याकडे बघितलं. त्याने माझं नाव, गाव विचारलं. माझ्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला “आता आपल्याला अनेक वर्ष इथेच राहायचं आहे. इथेच आपल्याला शिकायचं आहे. त्यामुळे रडून काही उपयोग होणार नाही. एक दोन दिवस तुला उदास वाटेल, पण नंतर तुलाही इथे राहण्याची सवय होऊन जाईल. ‘त्याच्या बोलण्याने मला थोडं बरं वाटलं. तो मला शाळा दाखविण्यासाठी घेऊन गेला. (I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS); Part 29)
आमच्या शाळेचा परिसर जवळपास तीस एकरांचा होता. त्यापैकी दहा एकर जागा रस्त्याच्या पलीकडे असलेल्या मैदानानेच व्यापली होती. मुख्य कंपाऊंडमध्ये शाळेची भव्य इमारत, आमचे होस्टेल, खाणावळ, बहुद्देशीय सभागृह, ज्याला आम्ही मल्टिपर्पज हॉल म्हणत असू ते, शिक्षकांच्या खोल्या, व्हॉलीबॉल, खो – खो ग्राऊंड इत्यादी होते. मी आयुष्यात प्रथमच दोन ताली इमारत पाहत होतो. मधुकर सोबत फिरताना शाळेच्या जिन्यावरून खाली – वर पळताना मला मौज वाटत होती. शाळेत बांधलेले संडाससुद्धा मी कौतुकाने पाहत होतो. बाथरूममधील आंघोळीचे शॉवर पाहून तर जगातलं एक आश्चर्यच पाहत असल्यासारखं मला वाटत होतं. आमच्या शाळेत एकूण सहा हाऊस होते. मुलांसाठी सातपुडा, हिमालय, विंध्य व सह्याद्री, तर मुलींसाठी नीलगिरी व कांचनगंगा. प्रत्येक…
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
