दिनांक ५ मार्च(घारगाव,श्रीगोंदा):
संस्कारक्षम शिक्षण हाच जीवनाचा पाया असून,याच पायावर यशाची व जागृक समाजाची भक्कम इमारत उभी राहू शकते.समाजातील वंचित व दुर्बल घटकांना दर्जेदार शिक्षण मिळाल्यास,परिवर्तन घडणार आहे. खर्या गरजवंताला मदत मिळाल्यास,केलेल्या मदतीचे समाधान मिळते.सरकारच्या अनेक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नाहीत.अशा परस्थितीत जय आनंद फाऊंडेशन व निरंजन सेवाभावी सारख्या विविध संस्था वंचितांना आधार देण्याचे काम करीत असल्याची,भावना(उद्योजक)नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केली.
जय आनंद फाऊंडेशन व निरंजन सेवाभावी संस्थेच्या विशेष प्रयत्नाने तर शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या अर्थसहाय्यातून घारगाव (तालुका श्रीगोंदा) येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक व महात्मा फुले माध्यमिक निवासी शाळेत उभारण्यात आलेल्या वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी फिरोदिया बोलत होते.एल अॅण्ड टी कंपनीची जनरल मॅनेजर अरविंद पारगावकर यांच्या अध्यक्षते – खाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी मर्चंट बँकेचे संचालक तथा जय आनंद फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कमलेश भंडारी,निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा,ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी,आशिर्वाद बाफना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
फिरोदिया म्हणाले की,घारगावच्या निवासी शाळेच्या माध्यमातून खामकर दांम्पत्य सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचा वारसा पुढे चालवित आहेत. शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच गरजू व दुर्बल घटकातील विद्यार्थी व खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे.
या शाळेस अजून दोन वर्ग खोल्यांची गरज असून,ती देखील फाऊंडेशनच्या माध्यमातून बांधून देण्याचे व मॅक्सीमस स्पोर्टस अकॅडमीच्या वतीने येथील विद्यार्थ्यांसाठी खेळाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.तर,आय लव्ह नगरच्या माध्यमातून येथील गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्यासाठी आवाहन केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
(वृत्तसंस्था)
